मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने आगमन केलं आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, पालघर, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण कोकणात पाऊस चांगलाच कोसळतोय. ठाण्यातील कल्याण डोंबिवली शहरात तर पाऊस प्रचंड मुसळधार कोसळतोय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांसाठी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाने 27 आणि 28 जूनसाठी महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकण, मध्यम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील भागाचा देखील समावेश आहे. हाच अलर्ट पुढे 29 आणि 30 जूनसाठी देखील असण्याची शक्यता आहे. पण या दरम्यान वातावरणात काही बदल झाल्यास पाऊस काही काळासाठी थांबूदेखील शकण्याचा किंवा कमी होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर शहारामध्ये पावसाने सध्या चांगलाच जोर धरला आहे. हा जोर पुढच्या 48 तासांसाठी कायम असण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगलाच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकणासह विदर्भातही पाऊस चांगली बॅटिंग करण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मान्सून यावर्षी उशिराने दाखल झालाय. पावसाची यावर्षी खूप वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत होता. जून महिन्याची 20 ते 22 तारीख उजाडल्यानंतरही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अनेकांना हे वर्ष दुष्काळाचं तर असणार नाही ना? अशी भीती वाटत होती. पण बिपरजॉय वादळामुळे मान्सून पुढे ढकलला होता. त्यामुळे पावसाला उशिर झाला. राज्यात 25 जूनला अनेक भागांमध्ये मान्सून दाखल झाला. त्यानंतर आता पावसाची चांगलीच बॅटिंग सुरु झाली आहे.
एकीकडे पाऊस उशिराने सुरु झाला असला तरी मुंबईत पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. अंधेरीत तर एक महिला वाहून जाण्यासापासून वाचली. तिला परिसरातील नागरिकांनी वाहून जाण्यापासून वाचवलं. तसेच वाहनांना दोरीने बांधण्यात आलं होतं. संबंधित घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.