मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमकाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. पुण्यातील काही भागांमध्ये आज गारांचा पाऊस पडलाय. याशिवाय अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. फक्त पुणेच नाही तर भंडारा जिल्ह्यातही पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतोय. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतंय. अनेक भागांमध्ये पीकं उद्ध्वस्त झालीय. शेतकरी हवालदिल झालाय. गेल्या महिन्याभरात अनेकवेळा या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. निसर्गाचा हा ऊन-सावलीचा खेळ आजही सुरु आहे. राज्यात आजही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. विशेष म्हणजे पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
परभणी जिल्ह्यात रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर रत्रभर सुसाट वारे वाहत होते. वाहणाऱ्या सुसाट वाऱ्यामुळे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंता परत वाढल्या आहेत. शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट कोसळल्यानंतर महसूल अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले नसल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जातेय.
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पुन्हा अवकाळी पाऊस पडला. वाऱ्यासह पाऊस झाल्याने भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाले. निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी भागातही अवकाळी पाऊस पडला. कर्नाटक सीमावर्ती भागातील वांजरखेड येथे वीज पडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर, लातूर, देवणी, निलंगा, उदगीर, औसा तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. काल सायंकाळनंतर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. त्यातच काल अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री पाऊस पडला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेले सोलापूरकर पावसामुळे सुखावले. मध्यरात्री आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. हवामान विभागाने 13, 14 आणि 15 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर मध्यरात्री पाऊसाने हजेरी लावली.