विशाळगडाच्या नावानं गावात धुडगूस, अतिक्रमण आंदोलन का चिघळलं?

| Updated on: Jul 17, 2024 | 9:12 PM

विशाळगडावरच्या वादात अतिक्रमणाशी संबंध नसलेलं एक गाव जमावानं टार्गेट केलं. त्या हल्ल्यावरुन विरोधकांनी सरकारवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय. नेमकं काय घडलं आणि त्यावर सरकारची बाजू काय जाणून घेऊयात.

विशाळगडाच्या नावानं गावात धुडगूस, अतिक्रमण आंदोलन का चिघळलं?
Follow us on

विशाळगडावरच्या अतिक्रमणाला धार्मिक रंग खुद्द सत्ताधाऱ्यांकडूनच दिला गेला का, यावरुन वाद रंगला आहे. नेमकं काय घडलं याची किमान नेत्यांना तरी पूर्ण माहिती होती का?.अशीही एक शंका आहे. कारण वेगवेगळे व्हिडीओ आणि अर्धवट माहितीनं सोशल मीडियात संभ्रम पसरवला जातो आहे. विशाळगडावर 158 ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत. मात्र अतिक्रमण हटाव आंदोलनाच्या आडून जमावानं जी धार्मिक स्थळांची तोडफोड केली ती किल्ल्याच्या पायथ्यापासून ३ किलोमीटर दूरच्या गजापूर गावात झाली. या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता.

दुसरा मुद्दा म्हणजे किल्ल्यावरचं अतिक्रमण काढा याला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे आणि ना ही विरोधकांचा. मात्र कोणताही संबंध नसलेल्या गजापूर गावात लोकांची घरं-धार्मिक स्थळं आणि वाहनं का तोडली यावरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न केले. पण, खुद्द गृहमंत्री फडणवीसांनीच शिवरायांच्या गडकोटांवरचे हिरवे झेंडे काढल्यानं विरोधकांना राग आला का म्हणत त्याला उत्तर दिलं.

मुळात गडावरचं अतिक्रमण आणि ते अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या जमावानं एका दुसऱ्या गावात केलेली तोडफोड यांचा परस्पर संबंध नसतानाही तो जोडला गेला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी फडणवीसांच्या हिरव्या झेंड्यांच्या विधानावर बोलण्यास नकार दिलाय.

विशाळगडाच्या अतिक्रमणाचा वाद नेमका का उद्भवला?

विशाळगडावर ११ हिंदू मंदिरं आणि एक मलिक रेहान नावाचा दर्गा आहे. यापैकी अनेक मंदिरं प्राचीन तर रेहान दर्गा अंदाजे अडीचशे वर्ष जुना आहे. त्यामुळे विशाळगड जेव्हा राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित झाला. तेव्हा मंदिरांसहीत दर्ग्याचाही त्यात समावेश आहे. मग प्रश्व उरतो की गडावरचं अतिक्रमण नेमकं आहे तरी काय?

तर मुख्यत्वे दर्गा आणि मंदिरांभोवती छोटी-छोटी दुकानं, पत्र्यांचे शेड, घरं बांधली गेली आहेत ते विशाळगडावरचं अतिक्रमण आहे. आणि या अतिक्रमणात मुस्लिमांबरोबरच काही हिंदूचाही समावेश आहे. हा झाला अतिक्रमण काय होतं याचा मुद्दा. आता अतिक्रमण आंदोलन का चिघळलं ते समजून घेऊयात.

अनेक वर्षांपासून विशाळगडावरची अतिक्रमण हटावची मोहिम सुरु आहे. सरकारनं साधारण दीड वर्षांपूर्वी याबद्दल कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र माहितीनुसार सत्तेशी संबंधित असलेल्या काही लोकप्रतिनिधींनीच अतिक्रमण हटवण्यास अडथळे आणले. नंतर संभाजीराजेंच्या दाव्यानुसार काही जण याविरोधात कोर्टात गेले म्हणून उशीर होत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र तो दावाही नंतर फोल ठरला. आता एकमेकांवर ढकला-ढकल सुरु आहे.