अजित पवारांचे मंत्री छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय, हे सध्या भाजपच्या नेत्यांनाही समजत नाही. त्याचं कारण आहे, भुजबळांच्या रोखठोक आणि सत्ताधाऱ्यांच्याच विरोधातल्या काही भूमिका. गेल्या काही दिवसांतल्या भुजबळांच्या भूमिका पाहिल्या तर भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडतो. छगन भुजबळ त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पहिली भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या अपमानावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर सत्ताधारी तुटून पडले. पण फोटो फाडल्याची कृती अनावधानानं घडल्याचं सांगत भुजबळ आव्हाडांच्या पाठीशी उभे राहिले.
आपण नाराज नाही हे सांगताच मला जे पटत नाही ते बोलणारच. आणि लोकसभेची जागा नाकारली तर राज्यसभेचं काय घेवून बसलात, असं भुजबळ म्हणाले आहेत.
तिसरी भूमिका आहे कांद्यावरुन. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या बंगलोर रोझ कांदा निर्यातीवरील निर्यातशुल्क हटवलं. पण महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवर 40 % निर्यात शुल्क कायम ठेवलं. त्यावरुन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला. गुजरात आणि कर्नाटकच्या कांद्यासाठी वेगळी भूमिका, मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय का ? असा सवाल भुजबळांनी केलाय.
चौथी भूमिका आहे, भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यामुळं संविधान बदलणार हा मेसेज खोलवर गेला आणि त्यामुळं महाराष्ट्रात वेगळा फरक पडला असं भुजबळ म्हणाले.
पाचवी भूमिका आहे, विधानसभेच्या जागा वाटपावरुन लोकसभेसारखी खटपट नको. भाजपनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणं 80-90 जागा मिळाव्यात, असं भाजपला भुजबळांनी सूचित केलं.
मनुस्मृती जाळताना घडलेल्या कृतीवरुन भुजबळांनी पुन्हा एकदा आव्हाडांची बाजू घेतली. त्यावरुन अजित पवार गटाच्या 2 मंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. भुजबळांनी आव्हाडांची बाजू घेणं दुर्दैवी असल्याचं मुश्रीफ म्हणाले. तर आधी मनुस्मृती जाळा मग आव्हाडांवर टीका करा, असा निशाणा भुजबळांनी साधला.
सडेतोड आणि आक्रमकतेसाठी भुजबळ ओळखले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भुजबळ, शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत आले. मात्र 3 पक्षांचं सरकार असतानाही भुजबळ, त्यांना जे वाटतंय ते रोखठोकपणे बोलून जात आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या गटातून निलेश लंके शरद पवारांकडे परतले. आता तसंच सूचकपणे शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण बोलल्या आहेत. लंके जरी शरद पवारांकडे परतले असले तर त्यांच्यात आणि भुजबळांमध्ये फरक आहे. लंकेंनी शरद पवारांवर टीका केलेली नव्हती. पण भुजबळ शरद पवारांवर टीका करुन बसलेत.