विशाळगडाच्या पायथ्यावरच्या गावांमध्ये तोडफोड करणाऱ्या 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तोडफोडीवरुन एमआयएमनं संभाजीराजेंना तर विरोधकांनी संभाजी भिडेंसह काही हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय. मात्र इतका जमाव पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कसा काय आक्रमक होतो? किल्ल्याच्या पायथ्यावरच्या गावांमध्ये तोडफोड का नियंत्रणात आणली गेली नाही? याचं उत्तर सरकार किंवा गृहविभागाकडे नाही.
अतिक्रमण विशाळगडावर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जमावानं तोडफोड केली. या गडापासून जवळपास ३ किलोमीटर लांबलेल्या गजापूर गावात या गावांचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. तरीही तिथल्या घरं-दुकानं-वाहनांची हिंसक जमावानं तोडफोड केली. पोलीस असूनही कायदा कुणी हाती घेतला. ज्यांचा अतिक्रमणाशी काहीही संबंध नाही. त्यांना लक्ष्य का केलं गेलं. यावरुन विरोधक सरकारला प्रश्न करत आहेत. तर विशाळ गडावरील अतिक्रमण निघाल्यानंतर मविआच्या पोटात दुखण्याचं काय काम. असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.
बाजीप्रभू देशपांडेंसह मावळ्यांनी जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली., त्याच पावनखिंडीपासून साधारण २३ किलोमीटर असलेला या विशाळगडावर शिवाजीराजे सुखरुप पोहोचले. शिवकाळात विशाळगड अत्यंत महत्वाचा होता. कोकण ते कोल्हापूरपर्यंतचा व्यापार ज्या मार्गानं व्हायचा. त्यासाठी विशाळगडाचा वापर टेहळणी म्हणून केला जायचा.
विशाळगड समोर अणुस्कुरा घाट, पुढे आंबा घाट, याच मार्गावरुन होणाऱ्या सर्व हालचालींवर विशाळगडावरुन बारीक लक्ष ठेवता यायचं. गूगल अर्थवरुन विशाळगडाचं चित्र सध्या पाहिले तर येथे दिसणारी सर्वच बांधकाम अनधिकृत नाहीत. इथलं मारुती मंदिर, अमृतेश्वर, भगवंतेश्वर, विठ्ठल-रुख्मिनी, गणेश, विठलाई, रामेश्वर, नरसोबा, वेताळ, वाघजाई, खोकलाई देवी आणि हजरत मलिक रेहान दर्गा आहे. हा दर्गाही इथं साधारण १७ व्या शतकापासून आहे. या सर्व वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत.
इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवस बोलतात. त्यासाठी बोकडंही कापली जातात. हळूहळू इथं येणाऱ्यांची संख्या वाढली., पर्यायानं किल्ल्यांवर पर्यटकांसाठी दुकानं, घरांचं अनधिकृत बांधकाम सुरु झालं. काही मंदिरांबाहेरही अशीच दुकानं उभी राहिली. घरं, पत्राचा शेड, दुकानं असं सर्व मिळून साधारण १५६ अनधिकृत बांधकामं इथं आहेत. यात मुस्लिमांसोबत काही हिंदूचाही समावेश आहे. माहितीनुसार इथली बहुतांश अनधिकृत बांधकामं ही साधारण १५ वर्षांपूर्वीची आहेत. आता काल-परवा नेमकं घडलं काय., ते समजून घेऊयात.
अनेक वर्षांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलनं होत आहे. दीड वर्षांपूर्वी प्रशासनानं बैठक घेवून अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही. 13 जुलैलाच पावनखिंडीतली लढाई झाल्यानं त्यादिवशी आधीपासून इथं मोठी संख्या जमली होती. त्यात अतिक्रमणाविरोधात 14 जुलैला संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेनं निघाले. मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या
दोन तासआधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि नंतर त्याचं पर्यावसान तोडफोडीत झालं.
विशाळगडाचा पायथा आहे तेथे आधी विशाळगडावर जाण्यासाठी लोकांना या दरीमार्गे जुन्या वाटेतून जावं लागत होतं. नंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला. पण जेव्हा वाद सुरु झाला., तेव्हा पोलीस लोखंडी पूलाभोवती होती., पण काही जमाव जुन्या मार्गानं वर शिरला. यानंतर खालीच थांबलेल्या जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेले आणि अतिक्रमनाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली. तोडफोडी प्रकरणी पुण्याच्या हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ, सेवा व्रत प्रतिष्ठानचे बंडा साळोखे यांच्यासह 400 ते 500
जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.