कोल्हापुरात राज घराण्यातला दत्तक वाद नेमका काय आहे? वारसदार वादाचा इतिहास काय?

| Updated on: Apr 30, 2024 | 2:05 PM

कोल्हापुरात वारसदाराचा वाद अजूनही कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांनंतर आता भाजपच्या राजवर्धन कदमबांडे यांनी शाहू महाराजांच्या वारशावरुन प्रश्न उपस्थित केलाय. आपणच खरे वारसदार असल्याचाही दावा कदमबांडे यांचा आहे.

कोल्हापुरात राज घराण्यातला दत्तक वाद नेमका काय आहे? वारसदार वादाचा इतिहास काय?
राजवर्धन कदमबांडे आणि शाहू महाराज छत्रपती यांचा फोटो
Follow us on

कोल्हापुरात शाहू महाराजांच्या वारसाचा वाद पुन्हा सुरु झालाय. राजवर्धन कदमबांडेंचा दावा आहे की तेच खरे गादीचे रक्ताचे आणि विचारांचेही वारसदार आहेत. यावर छत्रपती शाहूंच्या बाजूनं एका पत्राद्वारे उत्तर देण्यात आलंय. राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे. दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे.

याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांनी शाहू महाराजांच्या वारसाचा वाद बाहेर काढला होता. कोल्हापूरच्याच व्यक्तीनं निवडणुकीच्या तोंडावर असा वाद काढल्यानं यावरुन मंडलिकांवर टीकाही झाली. त्यानंतर मूळ धुळ्याचे असणारे भाजप नेते राजवर्धन कदमबांडेंनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून आपणच कोल्हापूरच्या गादीचे वारस असल्याचा दावा केला.

आता दत्तक वाद काय आहे?

शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजे राजाराम महाराज. त्यांचे पुत्र शिवाजीराजे छत्रपती म्हणजे करवीरच्या गादीचे पहिले राजे… यापुढच्या वारशात नववे राजे म्हणजे शिवाजीराजे छत्रपती चौथे हे होते. त्यांना इंग्रजांनी कैद केलं होतं. आणि कोठडीतच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांना मुल नसल्यामुळे राजर्षी शाहू महाराज हे कागलमधून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक आले. पुढे राजर्षी शाहू महाराजांचे पूत्र राजाराम महाराज गादीवर बसले. राजाराम महाराजांना तारा आणि विजयमाला अशा दोन पत्नी होत्या. यापैकी तारा यांना अपत्य नव्हतं, तर विजयमालांना पद्मा म्हणून एक मुलगी होती. वारस म्हणून तारा यांनी शहाजीराजेंना दत्तक घेतलं. पुढे शहाजीराजेंनी आत्ताच्या छत्रपती शाहू महाराजांना नागपूरच्या भोसले घराण्यासाठी दत्तक घेतलं. त्यावेळी पद्माराजे यांचे पुत्र म्हणजे राजवर्धन कदमबांडे यांना दत्तक घ्यावं, यावरुन वाद झाला होता. तोच वाद आता 1962 नंतर उफाळला आहे.

दत्तकाचा वाद नेमका आताच कसा उफाळून आला? यावरुन कोल्हापुरात चर्चा होत आहेत. मात्र रक्ताचे वारस हाच मुद्दा महत्वाचा असेल तर भविष्यात राजर्षी शाहू महाराज किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवरही प्रश्न उभे केले जातील. संजय मंडलिक ज्या शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस मानतात. मात्र यंदा स्वतः मंडलिकांनीच शाहू महाराज हे रक्ताचे वारसदार नाही म्हणून दत्तकवाद पुन्हा सुरु केलाय.