99 उमेदवारांची घोषणा, 11 नवे चेहरे, 13 महिलांना संधी, भाजपच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय?

| Updated on: Oct 20, 2024 | 9:11 PM

भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन विधानसभेच्या आखाड्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत ९९ जणांची नावं घोषित झाली आहेत. या यादीचं वैशिष्ट्यं काय, कोणत्या जागांवर अद्यापही सस्पेन्स कायम आहे, कोणत्या इच्छूकांचा जीव टांगणीला लागलाय ते पाहुयात.

99 उमेदवारांची घोषणा, 11 नवे चेहरे, 13 महिलांना संधी, भाजपच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय?
भाजप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिराने जाहीर केल्याने फटका बसलेल्या महायुतीने विधानसभेला मात्र एक पाऊल आघाडी घेतली आहे. भाजपने पहिल्याच यादीत तब्बल 99 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातून नागपूर द. पश्चिमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर दक्षिणमधून मोहन मते, नागपूर पूर्वमधून कृष्ण खोपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धुळे जिल्ह्यात धुळे शहरमधून अनुप अग्रवाल, शिंदखेड्यातून जयकुमार रावल आणि शिरपूरमधून काशिराम पावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात चार जागांवर विद्यमान भाजप आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर रावेरमधून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जवळपास 99 उमेदवारांची ही मोठी यादी आहे. या यादीचं वैशिष्ट काय आहे ते आपण जाणून घेऊयात.

भाजपच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपने जारी केलेल्या 99 जणांच्या यादीत 89 विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर 11 जागांवर नवीन उमेदवार जाहीर केले आहेत. भोकरमधून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण, भोकरदनमधून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे, तर मालाड पश्चिममधून आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपच्या यादीत मुंबईतले 14 उमेदवार जाहीर झाले आहेत.

भाजपने कुणाचं तिकीट कापलं?

चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्या जागी त्यांचे दीर शंकर जगतापांना उमेदवारी मिळाली आहे. बोरिवली जागेवर विद्यामान आमदार सुनील राणेंच्या जागेवर गोपाळ शेट्टीही इच्छुक, त्यामुळे नाव घोषित झालेलं नाही. कामठीतून टेकचंद सावरकरांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत भारती लव्हेकर, पराग शाह, सुनील राणेंच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. महत्वाचं म्हणजे ठाणे मतदारसंघ भाजपकडेच राहिलाय.आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

तीन अपक्ष आमदारांना भाजपचं तिकीट

याआधी अपक्ष लढलेले उरणचे महेश बालदी, देवळीतून राजेश बकाने आणि गोंदियातून विनोद अग्रवाल या तिघांना यंदा भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये सुधीर मुनगंटीवारांना बल्लारपूरमधून, तर मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा या दोघांना विधानसभेला उमेदवारी देण्यात आली आहे.

13 महिलांना उमेदवारी घोषित

पहिल्या यादीत भाजपनं 13 महिलांना संधी दिली आहे. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, पर्वतीत माधुरी मिसाळ, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, भोकरमधून श्रीजया चव्हाण, फुलंब्रीमधून अनराधा चव्हाण, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बेलापुरातून मंदा म्हात्रे, चिखलीमधून श्वेता महाले, दहिसरमधून मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, कल्याण पूर्वेतून सुलभा गायकवाडांना उमेदवारीची संधी मिळाली आहे.