मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांचे बारामतीवर विशेष प्रेम होते. मात्र, शिंदे सरकारमध्ये अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे बारामतीकर असलेले अजितदादा आता राज्याचे झाले आहेत. या सगळ्या राजकारणात अजितदादा यांचे बारामतीकडे जरा दुर्लक्षच झाले आहे. खुद्द अजितदादांनी तशी कबुली दिली आहे. कांद्याबाबत आम्ही शेतकऱ्यासोबत सोबत आहोत. शेतकरी यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारने 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एवढा मोठा निर्णय झाला नाही. कापूस मालाचे दर पडू देणार नाही. केंद्र सरकारकडून भाव ठरवला जातो. कापसालाही msp पेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.
40 टक्के निर्यात शुल्काबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी बोललो आहे. त्यांनी याबाबत फेरविचार करु असे आश्वासन दिले आहे. राज्यात कोल्ड स्टोरेज वाढविण्यासाठी केंद्र सरकारला पत्र देणार आहे. तसेच, कांदा चाळी वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक पक्ष बेरजेचा राजकारण करत असतो. त्यामुळे जिल्हा निहाय, तालुका निहाय संघटनेचे काम गतीने चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षनेते असताना दर आठवड्याला मी बारामतीला जात होतो. पण, आज मी उपमुख्यमंत्री आहे. माझ्यावर अधिक भार आहे. बारामतीमुळेच मी इथे आहे. गेले एक महिने २० दिवस झाले मी बारामतीला गेलो नाही. लवकरच मी तिथे जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री होतो. त्यांची आणि माझी फार ओळख नव्हती. पण, त्यांना अडीच वर्ष साथ देण्याचे काम केले. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही मी तेच करत आहे. त्यांना साथ देत आहे. मुख्यमंत्री पदाबाबत माझ्या मनात तसा विचार कधी शिवला नाही. हे मी आधीही स्पष्ट केलं आहे, असे अजितदादा यां स्पष्ट केले.