नागपूर | 11 डिसेंबर 2023 : विधानपरिषद सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढविला. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस हे सभागृहात माझ्यामागे बसत होते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेतला आहे. ते सज्जन, सुसंकृत गृहस्थ आहे असे मी मानतो. पण, ते अकार्यक्षम आहेत असा टोला लगावला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आमची कार्यक्षमता उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अवेध धंदे चालू नयेत या तुमच्या भावनेचे स्वागत आहे. पण हीच भूमिका कठोरपणे ठेवा. ही सलगता राहिली पाहिजे बरं का? बघा बरं नाही तर मग मीच काही पुरावे आणेन इथे असे खुले आव्हान खडसे यांना दिले.
विधानपरिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक मांडले. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी राज्यात कॅसिनो सुरु व्हावे यासाठी १९७६ मध्ये कायदा मंजूर केला. राज्याचे उत्पन्न वाढावे ही त्यामागची मानसिकता होती. जगातला कोणताही व्यक्ती तिथे गेला तर त्याला परवानगी आहे. विदेशी व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात डॉलर यावे हा त्यामागे उद्देश होता. पण, हिंदुस्थानी माणसाला तिथे परवानगी नाही. मुंबईत अनेक विदेशी व्यक्ती येतात. नेपाळच्या धर्तीवर समुद्राच्या बाजूला असा कॅसीनो उभा करण्यात येण्याची ती योजना होती अशी माहिती दिली.
२०१५ ला कॅसीनोला परवानगी देऊ तसा नियम केला. पण परवागी देण्यात आली नाही. दारू विक्रीसाठी परवानगी देतो. रेस कोर्समध्ये घोडे नाचवतो तेव्हा आपले संस्कार बुडत नाहीत. पण, कॅसिनोमुळे आपले संस्कार बुडतात. त्यामुळे कॅसीनो या नावाला विरोध आहे. राज्यात ऑनलाईन अनेक गेम सुरु आहेत. पण, त्यावर नियंत्रण असणारा कोणताही कायदा नाही. जळगावमध्ये ऑनलाईन गेममधून अनेकांची फसवणूक झाली. येथे अनेक अवेध धंदे सुरु आहेत. गृहमंत्री यांना 52 पत्रे लिहिली. कुणा कुणाला किती हप्ते दिले जातात याची माहिती दिली. पण, त्यांना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप खडसे यांनी केला.
एकनाथ खडसे यांचे भाषण सुरु असतानाचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना आणखी किती वेळ लागणार हे सांगा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही, असा काही नियम नाही असे खडसे यांनी सांगितले. मी बिलाच्या बाहेर बोलत असेल तर थांबवा. बिलावर किती वेळ बोलावे याचे बंधन नाही. एक कार्यक्षम गृहमंत्री समोर असेल तर प्रश्न विचारू नये का? माझ्यामागे ते बसत होते. त्यामुळे देवेंद्र यांच्या मार्गदर्शनाचा मी लाभ घेतला आहे. सज्जन, सुसंस्कृत गृहस्थ आहेत असे मी मानतो. पण, ते अकार्यक्षम आहेत. तुमच्यात गृहमंत्रीपदाची कार्यक्षमता मजबूत करायची असेल तर कारवाई करा, असा टोला खडसे यांनी लगावला.
त्याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके वर्ष हा कायदा लागू केला नाही कारण राज्याची संस्कृती तशी नाही. डान्स बार बंदी कायदा करणारे महाराष्ट्र राज्यच आहे. डान्स बार चालू नये. दारूबंदी कायदा आहे. तरीही अवेध दारूचा व्यवसाय काही कमी झाला नाही. वाईट प्रवृत्ती कोणतही कायद्याने संपल्या नाहीत. पण, त्यासाठी कायदाच करू नये असे नाही. कॅसिनोचा कायदा केला. त्याआधारे आम्हाला परवानगी द्या यासाठी काही जण कोर्टात गेले. त्यामुळे हा कायदा आणत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नाथाभाऊ यांचे माझ्यावर असलेले प्रेम जगप्रसिध्द आहे. तुम्ही काही पत्र दिली ती सर्व पत्र मी पोलिसांकडे पाठविली आहेत. पण, तुम्ही त्याचा पुरावा काय दिला? तुम्ही पत्र लिहिले म्हणजे पुरावा होत नाही? तुमच्यासारखा सिनिअर माणूस नाथाभाऊ त्या पत्रात तुम्ही राजकीय विरोधकांची नावे लिहिली. हा धंदा करतो. तो हप्ता घेतो. हा पुरावा मानायचा का? कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुराव्यानिशी सभागृहात येत होते. तुमच्यासोबत मी ही काम केलं आहे. आपण पुरावे आणायचो. असे नाही होत नाथाभाऊ. आणि हो ! आमची कार्यक्षमता उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अवेध धंदे चालू नयेत ही तुमची भावना आहे याचे स्वागत. हीच भूमिका कठोरपणे कायम ठेवा. ही सलगता राहिली पाहिजे बरं का? बघा बरं नाही तर मग मीच काही पुरावे आणेन इथे असे खुले आव्हान फडणवीस यांनी खडसे यांना दिले.