मुंबई : राज्यात उष्माघात प्रचंड वाढला असून कंटाळलेल्या जनतेला पावसाने थोडा दिलासा दिला आहे. राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले असले तरी काही भागात मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील नागरिक भर उन्हात पाण्याच्या वर्षावाचा आनंद घेत आहेत. पुणे, चाकण, पिंपरी चिंचवड, येवला, सांगली, नागपूर या ठिकाणी पावसाने हजेरी लागली आहे. मात्र, नाशिकमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुण्यात पाऊस बरसत असला तरी दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
पुण्यात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. काही वेळातच पुण्याला पावसाने झोडपले. गारांसह येथे पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. पुण्याच्या औंध, सांगवी आणि वाकड परिसरातही जोरदार पाऊस झाला.
औद्योगिक क्षेत्र नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. पुणे नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वादळी वारे वाहू लागले. चाकणमध्ये काही ठिकाणी पत्राशेड कोसळली असून शेडखाली दुचाकी अडकल्या आहेत. याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्येही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते. सकाळपासूनही उन्हाच्या झळा बसत होत्या. अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याने शहरवासीय मात्र सुखावले आहेत.
नाशिकच्या येवलामध्ये अंकाई, तांदुळवाडी फाटा, आहेरवाडी या गावांसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा दमदार पाऊस झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. येवल्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभाचे कार्यक्रम होते. अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळीची त्रेधातिरपीट उडाली.
सांगलीकरांना आज दुहेरी वातावरणाचा अनुभव घेतला. दुपारी उन्हामुळे सांगलीकर हैरान झाले असतानाच पावसाच्या सरीना सुरवात झाली. विश्रामबाग येथे भर उन्हातच जोरदार पावसाच्या सरी सुरू झाल्याने नागरिकांना या वातावरणाचा आनंद घेता आला.
सांगलीत अनेक दिवसांपासून पारा 35 ते 40 डिग्री अंशावर असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या पावसाने नागरिकांना काही प्रमाणात थंडावा मिळाला. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा झाला. त्यामुळे येथील झाडे वाऱ्यामुळे वाकली तसेच सुकी पाने गळून त्याचा खच पडलेला दिसत होता.
नागपूरच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत उन्ह तापली होती. पण, त्यानंतर पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऊन अशी नागपूरमध्ये परिस्थिती होती.
जळगावमधील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अहिरवाडी खानापूर सर्कल परिसरात केळीचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा सापडला आहे
राज्यात काही ठिकाणी पावसाने सुरवात केली असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा बसत असून जवळपास एक लाख नागरिकांना 53 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सर्वाधिक 43 गावांमध्ये 20 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर, विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात देखील 9 टँकर सुरू आहे.