भाजप नेते विनोद तावडे आज विरारच्या विवांत हॉटेलमध्ये नालासोपाऱ्याचे भाजप उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी गेले. पण त्यानंतर वेगळ्याच घडामोडी बघायला मिळाल्या. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत बहिआचे कार्यकर्तेदेखील होते. त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. तसेच विनोद तावडे यांनी पैसे वाटपासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर हा सगळा प्रकार घडताना बघायला मिळाला. विवांत हॉटेलमध्ये तीन तास मोठा गोंधळ बघायला मिळाला. या राड्यामुळे विनोद तावडे यांना विवांत हॉटेलमध्ये स्थानबद्ध व्हावं लागलं. विनोद तावडे यांच्यावर पैशांच्या वाटपाचा गंभीर आरोप करणारे ठाकूर पिता-पुत्र नेमके कोण आहेत? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
विनोद तावडेंवर आरोप करणारे हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांची पालघर जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. ते 1990 मध्ये पालघर जिल्ह्यातील वसई-विरारचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. याच पक्षाचं नाव पुढे बहुजन विकास आघाडी करण्यात आलं. या पक्षाच्या स्थापनेनंतर हितेंद्र ठाकूर 3 वेळा जिंकून आले. हितेंद्र ठाकूर एकूण 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वसई विरार महापालिका, वसई तालुका पंचायत समिती, तसेच पालघर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाची ताकद आहे.
क्षितीज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. ते नालासोपारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे 2009 पासून सलग 3 विधानसभा निवडणुकीत क्षितीज ठाकूर जिंकून आले आहेत. त्यांचं देखील नालासोपाऱ्यात चांगलं प्रभुत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात बविआ पक्षाने नुकतीच विधानसभा निवडणूकही लढली. क्षितीज ठाकूर हे आज विनोद तावडे यांच्यावर आरोप करताना आक्रमक झालेले बघायला मिळाले.