महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 11 तारखेला जाहीर होणार आहे. त्याआधी पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे. हरियाणात भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानं ठाकरेंनी दबाव टाकला का ?, अशी चर्चा सुरु झाली आहे. हरियाणाचा निकाल भाजपच्या बाजूनं लागला आणि काँग्रेसला जबर धक्का बसला. इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केल्याने काँग्रेस कैचीत सापडली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चेहरा जाहीर करावा, माझा पाठींबा असेल असा पुनवृच्चार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केला. ही मागणी करतानाच, आपलं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नसून पुन्हा येईन वरुन फडणवीसांना टोलाही लगावला. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी वारंवार मागणी वारंवार करत आहेत मात्र काँग्रेस आणि शरद पवारांनीही निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याचं म्हटलं. आता उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर पुन्हा, हायकमांड निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
11 तारखेला म्हणजे, दसऱ्याच्या एक दिवसाआधी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे…पण त्यासोबतच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. उद्धव ठाकरेंनाच, पुन्हा मुख्यमंत्री करायचंय, हे संजय राऊतांनी याआधीही सांगितलं आहे. मात्र आधीच चेहरा घोषित करण्यास ना शरद पवारांची तयारी आहे, ना काँग्रेसची. त्यामुळे महाविकासआघाडीत या मुद्द्यांवरुन मतभेद पाहायला मिळू शकतात.
दुसरीकडे राज्यात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण हरियाणात भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. तर जम्मूकाश्मीर मध्ये ही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. आज मुंबईत भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. हरियाणा तो अभी झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है असा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता.