महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशाची संपू्र्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील जनतेचा नेमका कौल काय आहे? ते समोर आलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला भरघोस पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून नाकारलं आहे. फडणवीसांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय फडणवीस आता पुन्हा नव्याने महाराष्ट्रात राजकीय वाटचाल करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना सत्तेतून बाहेर पडायचं आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी ते राजीनाम्याच्या तयारीत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण असेल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचबाबत आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही प्रमुख नेते आज दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. तसेच खातेवाटपाच्या चर्चेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीआधी दुपारी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या हालचाली झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संसदेच्या सेंट्रस हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपच्या खासदार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तिथे दाखल झाले. अजित पवार अगोदरपासूनच तिथे उपस्थित होते. यावेळी या तीनही प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी राजीनामा दिला तर भाजपकडून महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण असेल? तसेच उपमुख्यमंत्री हे तिसरं पद सरकारमध्ये ठेवावं की नाही? अशी देखील चर्चा या बैठकीत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद सरकारमध्ये कायम असू शकतं. पण या पदी कुणाची वर्णी लागू शकते? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यास भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
या बैठकीत आणखी एक महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर फडणवीसांकडे असणार गृहमंत्रीपदही त्यांच्याचकडे असणार का? याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांना गृहमंत्री करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्यानंतर कदाचित भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची माळ पडू शकते? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.