महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण; अखेर फडणवीसांनी सांगून टाकलं

| Updated on: Oct 28, 2024 | 8:46 PM

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण; अखेर फडणवीसांनी सांगून टाकलं
Follow us on

विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, प्रचारात रंगत आली असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. उद्या विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी जवळपास सर्वच जागांवर आता उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता हा सामना महाविकास आघाडी विरोधात महायुती असाच रंगणार आहे. मात्र अजूनही दोन्ही कडून देखील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार? यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही 9 च्या सत्ता संमेलनमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

महाविकास आघाडी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल त्याच्या 15 मिनिटांत आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करू. आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे चेहरा आहे. त्यांच्याकडे कोणता चेहरा आहे हे त्यांना विचारा.

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आमच्या पार्लमेंट्री बोर्डाचे लोक बसून घेतीत. ते जे निर्णय घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. आमचा फॉर्म्युला ठरला नाही. स्ट्राईक रेट आमचा सर्वांचा चांगला आहे. आम्ही तिन्ही नेते बसू आणि निर्णय घेऊ. ज्या काही थिअरीज चालवल्या जात आहेत त्यात दम नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोतला त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मोठे नेते आहेत. मात्र कधी कधी ते लेव्हल सोडून देतात. मी त्यांना एक गोष्ट सांगतो, कोई किसी की हस्ती मिटा नही सकती. राजनीती में किसी को समाप्त करना है तो केवल जनता करती है. कोणत्याही नेत्यात ताकद नाही. जनताच ते करू शकते. दुसऱ्यांचं अस्तित्व संपवण्याची कोणत्याही नेत्यात ताकद नाही. राजकारणात आणि लोकशाहीत जनताच कुणालाही कधी संपवू शकतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.