अहमदनगर : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव करण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद या शहराचे नाव बदलून केंद्रीय गृह मंत्रालयने २४ फेब्रुवारी २०२३ ही या दोन्ही शहरांची नावे बदलण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर या दोन्ही शहरांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चौंडी येथील कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. ११ महिन्यात तिसऱ्या शहराचे नाव शिंदे-फडणवीस यांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
का दिले अहिल्यादेवी यांचे नाव
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय का झाला? काय आहे अहमदनगर जिल्हा आणि अहिल्यादेवी यांचा संबंध? हे पाहूया…
अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी अहिल्यादेवी यांना लिहिण्यास अन् वाचण्यास शिकवले. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. त्यावेळी ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हारराव यांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा खंडेराव यांची वधू म्हणून अहिल्यादेवी यांना आणले.
अहिल्यादेवी पाहू लागल्या कारभार
अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हारराव यांनी अहिल्यादेवी यांना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्यादेवी मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
अनेक देवळांच्या आश्रयदात्या
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी देशभरात अनेक हिंदू मंदिरे बांधली. लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवी यांनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
या ठिकाणी अहिल्यादेवी यांचे नाव
अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून इंदूर येथील विद्यापीठास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरला आहे. आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव त्यांच्या नावाने होणार आहे.