महायुतीत तरी या जागांवर स्वतंत्र का लढताय शिंदे आणि अजितदादा, मास्टर गेम काय?

| Updated on: Oct 31, 2024 | 9:33 PM

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. महायुतीत तीन आणि महाविकासआघाडीत तीन महत्त्वाचे पक्ष आहेत. पण महायुतीत असताना देखील काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट स्वतंत्र का लढतायत जाणून घ्या.

महायुतीत तरी या जागांवर स्वतंत्र का लढताय शिंदे आणि अजितदादा, मास्टर गेम काय?
Follow us on

भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांनाच नंतर सोबत घेणं असो किंवा त्या नेत्यांवरुन उद्भवणारे वाद असोत. भाजपच्या भूमिकेला विरोधकांनी पुन्हा एकदा घेरलंय. त्याचं कारण ठरले आहेत नवाब मलिक. राष्ट्रवादी अखंड असताना देवेंद्र फडणवीसांनी मलिकांवर गंभीर आरोप केले होते
त्याच आरोपात मलिकांना तुरुंगात जावं लागलं. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. भाजपसोबत महायुतीतले घटकपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुद्धा. जामिनानंतर मलिक जेव्हा सत्ताधारी बाकांवर बसले होते., त्यावेळी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून सत्तेहून देश मोठा आहे म्हणत आरोप सिद्ध होईपर्यंत मलिकांना आमचा विरोध असेल. त्यांच्यामुळे महायुतीला बाधा पोहोचेल. असं अजित पवारांना निक्षून सांगितलं होतं.

त्याच अजित पवारांनी फडणवीसांच्या पत्राला केराच्या टोपलीत टाकत मलिकांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिलीय. त्यावर आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही., असं फडणवीसांनी म्हटलंय. भाजपची भूमिका ”नवाब मलिक आम्हाला चालणार नाहीत” इथंपासून ते ”नवाब मलिकांचा आम्ही प्रचार करणार नाही”., इथपर्यंत आली आहे.

अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं अविनाश राणेंना तिकीट दिलंय. दुसरीकडे मविआतून शरद पवार गटाचे फहाद अहमद उमेदवार आहेत. याठिकाणी भाजपनं सना मलिकांना पाठिंबा दिलाय. म्हणजे इथं महायुतीतील अजित पवार आणि भाजप एकसाथ आहे. तर शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे लढतेय.

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये अजित पवारांकडून नवाब मलिक, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील आणि मविआकडून सपाचे अबू आझमी उमेदवार आहेत. याठिकाणी भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे इथं शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत., तर अजित पवार गटाचे मलिक स्वतंत्र.

प्राथमिकदृष्ट्या या दोन्ही जागांवरुन महायुतीत मतभेद दिसतात. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते महायुतीनं काही जागांवर आपापसातच उमेदवार देण्यामागे मतभेद नव्हे तर मतविभाजन हे कारण असू शकतं.

कारण 2019 ला दौंड विधानसभेत भाजपचे राहुल कूल राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांविरोधात फक्त 746 मतांनी जिंकले होते. यावेळी पु्न्हा भाजपचे राहुल कुल विरुद्ध शरद पवार गटाचे रमेश थोरात लढतायत. याठिकाणी भाजपचा उमेदवार असूनही अजित पवारांच्या
राष्ट्रवादीनं घड्याळ चिन्हावर वीरधवल जगदाळेंना तिकीट दिलंय.

सिंदखेडराजात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांविरोधात 8,938 मतांनी विजयी झाले होते. यंदा शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून शशिकांत शिंदेंना तिकीट दिलं गेलं., त्यानंतर अजित पवारांनी याच जागेवर
मनोज कायंदेंना राष्ट्रवादीचं तिकीट दिलंय.

गेल्यावेळी नागपूरच्या काटोल विधानसभेतून राष्ट्रवादी एकसंध असताना अनिल देशमुखांनी भाजपच्या चरणसिंह ठाकूरांचा 17 हजार 57 मतांनी पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत. यंदा काटोलमध्ये शरद पवार गटाचे सलिल देशमुख विरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूरांचा सामना होतोय. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्दा घड्याळ चिन्हावर याठिकाणी अनिल देशमुख नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.