मुंबई । 29 जुलै 2023 : विधानसभेत विरोधी पक्षनेते अभावी दुसऱ्या आठवड्याचेही कामकाज पूर्ण झाले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सत्तेत सामील झाल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. विधानसभेत महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून आता काँग्रेस पुढे आल्याने साहजिकच या पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, 28 दिवस उलटूनही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठी योग्य उमेदवार सापडलेला नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असे नेते काँग्रेसमध्ये आहेत. तरीही विरोधी पक्षनेते पदासाठी कोण उमेदवार द्यावा यासाठी काँगेसची दमछाक होत आहे. काय आहे यामागचे कारण?
विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरून भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला डिवचले. आजपर्यत यांना विरोधी पक्षनेता का घोषित करता आला नाही हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे,. जनतेची इच्छा आहे. विरोधी पक्षनेते नसताना सरकारच्या निर्णयाला विरोध करणे ही धोक्याची घंटा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
त्यावर पलटवार करताना काँग्रेसचे नाना पटोले यांनी सरकारला अडचणीत आणणारा मुद्दा उपस्थित केला. आम्ही विरोधी पक्षनेता का निवडला नाही? हा जर तुमचा मुद्दा असेल तर सहा जिल्ह्यात एकच मंत्री पालकमंत्री आहे. काय चाललंय या राज्यात? अवकाळी पावसात आमचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात पोहोचू शकला नाही. हा आमचाही मुद्दा आहे. आम्हालाही बोलता येते, असे पटोले म्हणाले.
शिवसेना, राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांना फोडल्यानंतर भाजपची नजर आता काँग्रेसवर आहे. काँग्रेसचे किमान 30 आमदार फुटीरतेच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. याआधी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे कट्टर काँग्रेस समर्थक असले तरी त्यांना पक्षातूनच विरोध आहे.
दुसरीकडे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे प्रबळ उमेदवार मंत्री राहिल्याने त्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा मागे लावून पुन्हा विरोधी पक्षनेते फोडण्याची खेळी भाजप खेळू शकते. त्यातच विरोधी पक्षनेते पदावर आमदार संग्राम थोपटे यांनी दावा सांगितला असून त्यांनी काँग्रेस हायकमांडला थेट 30 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र पाठविले आहे.
काँग्रेसचे विधासनभेत संख्याबळ 43 इतके आहे. त्यात संग्राम थोपटे यांना 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. ही संख्या एक तृतीयांश इतकी होत असल्याने काँग्रेसने पक्ष फुटीचा धसका घेतला आहे. त्यामुळेच विरोधी पक्ष नेतेपदाचा तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.