वाल्मिक कराड प्रकरणात ईडी एन्ट्री हवी होती…सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप

| Updated on: Jan 09, 2025 | 1:56 PM

पीएमएलए आणि ईडीची कारवाई वाल्मिक कराडवर आतापर्यंत का झाली नाही. वाल्मिक कराडच्या नावाने २०२२ मध्ये नोटीस काढली होती. त्यानंतर कारवाई झाली नाही. परंतु संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर काहीही पुरावे नसताना कारवाई झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

वाल्मिक कराड प्रकरणात ईडी एन्ट्री हवी होती...सुप्रिया सुळे यांचा मोठा आरोप
Follow us on

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ed) आणि पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

अर्थ मंत्रालयाला पत्र देणार

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पीएमएलए आणि ईडीची कारवाई वाल्मिक कराडवर आतापर्यंत का झाली नाही. वाल्मिक कराडच्या नावाने २०२२ मध्ये नोटीस काढली होती. त्यानंतर कारवाई झाली नाही. परंतु संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर काहीही पुरावे नसताना कारवाई झाली. तसेच आठ महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून एफआयआर झाला असताना वाल्मिक कराडवर कारवाई का नाही. यासंदर्भात आम्ही अर्थ मंत्रालयाला पत्र देणार आहोत.

वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही. तो सामाजिक विषय आहे. अवधा कंपनीने एक्सक्टार्कशनचा हा गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर ईडी आणि पीएमएलएची कारवाई का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

गुन्हा असताना लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद

आर्थिक गैरव्यवहार असल्यावर ईडीची कारवाई होते. परंतु वाल्मिक कराडवर कारवाई का झाली नाही. तसेच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना परळीच्या लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद त्याला दिले. गुन्हा दाखल असताना त्याला या महत्वाच्या योजनेचे अध्यक्ष का केले, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. वाल्मिक कराडसोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक व्यवहार आहेत. मग त्यांच्यावर कारवाई व्हावी का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्याचे उत्तर सरकारकडे मागा. मी सरकारमध्ये नाही, असे खासदार सुळे यांनी सांगितले.