नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय चातुर्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय भाकरी फिरवली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बड्या नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला होता. पण शरद पवार यांनी अखेर महत्त्वाचा निर्णय घेतलाच आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज मोठी घोषणा केली.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी दोन नेत्यांची निवड केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. तर दुसरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सध्या तरी कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाहीय.
शरद पवार यांनी आपल्या घोषणेत आणखी इतर नेत्यांना देखील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली नाही तर पक्षाला कदाचित नुकसान होऊ शकतं. याच गोष्टीचा विचार मनात ठेवून पवारांकडून दोन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ज्या नेत्यांचं शिष्टमंडळ नेमलं होतं त्याच शिष्टमंडळाचा हा सल्ला होता, अशी देखील माहिती आता समोर येऊ लागली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमत घोषणा देखील केलीय.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकींची जबाबदारी सोपवली आहे. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा राज्यांची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय महिला युवा, लोकसभा समन्वयाची जबाबदारी देखील सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी, अल्पलसंख्याक विभागाच्या प्रभारी पदाची देखील जबाबदारी तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शरद पवार यांनी नंदा शास्त्री यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती क्ली आहे. तर फैसल यांच्यावर तामिळनाडू, तेलंगणा, केरळची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शरद पवार यांचा राजकीय वारस कोण? हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. कारण शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सुद्धा राजकारणात आहेत. तसेच त्यांचे पुतणे अजित पवार हे देखील राजकारणात आहे. दोन्ही नेते आपापल्या जागी योग्य आहेत. अजित पवार हे प्रभावशील व्यक्तीमत्व आहेत. ते स्पष्टवक्ते आहेत. तर सुप्रिया सुळे खूप मायाळू व्यक्तीमत्व आहे. दोन्ही नेते आपापल्या जागेवर योग्य आणि दोघांची पक्षाला गरज आहे. पण गेल्या काही दिवसांपासून काही अनपेक्षित बातम्या समोर येत होत्या.
सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपसोबत जाण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. एक गटाचं म्हणणं आहे की, भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी व्हावं. तर दुसऱ्या गटाचा त्याला स्पष्ट विरोध आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशी बातमी जोर धरु लागली. या चर्चांवर अजित पवार स्वत: तीन दिवसांनी माध्यमांसमोर येवून बोलले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
कदाचित शरद पवार यांना धोक्याची जाण आधीच झाली होती. कारण शिवसेना पक्षात काय घडलं, हे ताजं उदाहरण आहे. अशाप्रसंगात राष्ट्रवादी पक्षातसोबत असं घडणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे शरद पवार यांनी खूप नामी शक्कल लढवली असं मानलं जातं. त्यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेवटी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय, अशी घोषणा केली. यावेळी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते वगळता बाकी सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याचा थेट विरोध केला. सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी शरद पवार यांच्याभोवती गराडा घातला.
यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी त्यावेळी अगदी सुप्रिया सुळे यांनाही बोलू दिलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार यांचे वेगळे सूर असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. पण पक्षातील कार्यकर्त्यांचं आंदोलन आणि इतर नेत्यांचा आग्रह पाहिल्यानंतर अजित पवार यांनादेखील शरद पवार हेच अध्यक्ष राहावे, या मतावर ठाम राहावं लागलं होतं.
शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल यांची भक्कम साथ असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे यावेळी शरद पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांनादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबादारी सोपवली आहे. शरद पवार यांनी या निर्णयातून सुवर्णमध्य साधला आहे. पक्षाला एकसंघ बांधण्यासाठी त्यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.