उमेश पारीक ,लासलगाव, नाशिक : राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन बंपर झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत देशांतर्गत घट झाली आहे. त्याचाही थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे राज्यात कांद्याचे दर घसरले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना रस्त्यावर कांदा फेकून द्यावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. लासलगाव बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाल्यामुळे भावात घसरण झाली आहे.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा 3 लाख क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. सन – २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती.
सन – २०२३ च्या फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव कोसळण्यावर झाला आहे. गेल्या वर्षी फेबुवारी महिन्यात ९ लाख क्विंटल लाल कांद्याला जास्तीजास्त ३११५ रुपये , कमीतकमी ५०० रुपये तर सरासरी २१३३ रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळला होता.
यंदा फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार लाल कांद्याची आवक झाली. जास्तीजास्त १६०० रुपये, कमीतकमी २०० रुपये तर सरासरी ८४० रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. गेल्या वर्षापेक्षा शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटलमागे १३०० रुपये नुकसान झाल्याने अंदाजे १५१ कोटी ४५ लाख रुपयांचा एकट्या लासलगाव बाजार समिती विक्री झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादकांना फटका बसला आहे.
पिकात सोडल्या मेंढ्या
सातत्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याने हताश होत येवला तालुक्यातील धामणगाव येथील दादा गुळवे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने आपल्या उभ्या कांदा पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या आहे.
कांद्याला दोनशे रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने काढणीचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळणार असल्याने अक्षरशा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने उभ्या कांदा पिकात मेंढ्या चरण्यास सोडून देत मेंढ्यांचे तरी पोट भरेल लक्ष्मीला तरी दोन घास मिळतील व याचा आशीर्वाद सरकारला मिळेल, अशा अनोख्या पद्धतीने या शेतकऱ्यांने सरकार बद्दल रोष व्यक्त केला.
नंदुरबारात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
नंदुरबार बाजारात कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे कांद्याने चांगलाच वांदा केला आहे. हल्ली बाजारात केवळ चार ते सात रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांनी कांदा पिकांवर केलेला खर्च खर्च देखील निघणार रस्त्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिली आहे. दररोज नंदुरबार येथील महात्मा ज्योतिबा फुले बाजारपेठेमध्ये ३०० ते ४०० कट्टे दररोज कांदे विक्रीला दाखल होत आहेत. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.