मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात महाराष्ट्रातून चार जणांना मंत्री करण्यात आलंय. त्यात सर्वात जास्त चर्चा
होतीय ते भागवत कराड यांना मिळालेल्या मंत्रिपदाची. त्याला कारण आहेत मुंडे भगिनी. कारण कराडांना
दिलेल्या मंत्रिपदामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेच्या एका सभेचा
व्हीडीओ व्हायरल होतोय. या व्हीडीओत महादेव जानकर आहेत, पंकजा मुंडे आहेत, राम शिंदेही आहेत. आणि
विशेष म्हणजे भागवत कराडही आहेत. आता व्हीडीओ व्हायरल होतोय तो भागवत कराडांमुळे. काय आहे त्या
व्हीडीओत?
काय आहे त्या व्हायरल व्हीडीओत?
1 मिनिट 24 सेकंदाचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ 2016 सालचा आहे. ह्या व्हीडीओत राष्ट्रीय समाजपक्षाचे
नेते महादेव जानकर भाषण करतायत. तर सोफ्यावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर,
आणि नामदेव शास्त्रीही आहेत. भगवानगडावर जो दसरा मेळावा होतो, त्यावेळेसची ही सभा आहे. याच
सभेत महादेव जानकारांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. पंकजा मुंडे, राम शिंदे त्यावेळेस मंत्री होते.
जानकरांच्या फटकेबाजीला टाळ्या पडत होत्या कारण ते मंत्री असूनही फडणवीस सरकारला कधी
प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टोले मारत होते. मुंडे भगिनी त्यावेळेसही फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा
होतीच.
आता का चर्चेत आहे तो व्हीडीओ?
जवळपास पाच वर्षानंतर हा व्हीडीओ पुन्हा चर्चेत आहे. त्याला कारण आहेत ते केंद्रात नव्यानं मंत्री
झालेले भागवत कराड. ह्या व्हिडीओत भागवत कराड जानकरांच्या मागे उभे आहेत. त्यावेळेस त्यांनी
ह्या सभेचं सूत्रसंचलन केलं होतं. एक प्रकारे सभेचं स्टेज सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
व्हीडीओतही ज्यावेळेस गर्दी हुल्लडबाजी करायला लागली त्यावेळेस भागवत कराडांनीच त्या गर्दीला
थोपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. हा व्हीडीओ व्हायरल होतोय ते बदललेल्या परिस्थितीमुळे.
म्हणजेच मुंडे भगिनींचं स्टेज सांभाळणाऱ्या एका कार्यकर्त्याला भाजपनं थेट केंद्रीय मंत्री केलं. ह्या व्हीडीओत
जे थाटामाटात बसलेले नेते मंडळी आहेत, त्यात पंकजा मुंडे विधानसभेला पराभूत झाल्या. राम
शिंदेही पडले. बबनराव लोणीकर तेवढे निवडूण आले. महादेव जानकरही आता फार सक्रिय
दिसत नाहीत. भागवत कराडांना मंत्रीपद मिळालं म्हणून प्रीतम मुंडेच नाराज आहेत. नामदेव शास्त्री
आणि मुंडे भगिनी यांच्यातही फार सख्य राहीलं नाही. पाच वर्षात सोफ्यावर बसलेली, भाषणं ठोकणारी
मंडळी जवळपास अडगळीत पडलीयत आणि स्टेज सांभाळणारा आधी खासदार झाला आणि नंतर मंत्रीही.
तेही अर्थखात्याचे राज्यमंत्री.