मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Andolan) आज दुपारी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर येऊन जोरदार आंदोलन केलं. काही एसटी आंदोलकांनी तर पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलही भिरकावली. तर काहींनी पवारांवर शिवराळ भाषेत टीकाही केली. ठिय्या आंदोलन करत या आंदोलकांनी शरद पवार हाय हायच्या घोषणाही दिल्या. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. अचानक मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आंदोलकांना चांगलेच फैलावर घेतलं. खासकरून राऊतांनी आंदोलकांच्या शिवराळ भाषेवर घणाघाती हल्ला चढवला. या कामगारांचे वर्तन योग्य नाही. शोभणारं नाही. त्यांची भाषा बरोबर नाही. या लोकांचे नेते कोण आहेत आणि त्यांचे संस्कार काय आहेत हे पाहावं लागेल असं राऊत म्हणाले. मात्र, राऊत गेल्या दोन दिवसांपासून शिवराळ भाषेचा वापर करत आहेत. असं असताना त्यांनी इतरांचे संस्कार काढल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वाचा सविस्तर : https://t.co/nuoNgNzv58
कुणावर काय म्हणाले संजय राऊत…?#sanjayraut #ststrike #kiritsomaiya pic.twitter.com/e0HYl1ovH2— TV9 Marathi (@TV9Marathi) April 8, 2022
शरद पवार हे संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत. आंदोलनं, मोर्चे हा लोकांचा हक्क आहे असं मानणारे पवार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेही तेच मानणारे होते. ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाला सुप्रिया सुळे निर्भयपणे सामोरे गेल्या. आंदोलकांशी चर्चा करत होत्या, हात जोडून विनंती करत होत्या. परंतु, समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन होतं हे लोकशाहीला शोभणारं नाही. या लोकांचे नेते कोण आहेत हे पाहावं लागेल. त्यांचे संस्कार काय आहेत हे पाहावे लागेल, अशी टीका राऊत यांनी केली.
6 एप्रिल रोजी राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका केली होती. हा काय मला पराक्रम दाखवणार? सोमय्या म्हणजे कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. ही कीड संजय राऊत संपवणार. ही कीड शिवसेना संपवणार. पराक्रम काय सांगतो मला. हा Xत्या माणूस पराक्रम सांगतो का? हे सर्व महाराष्ट्र द्रोही, देशद्रोही आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक केली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
6 एप्रिल रोजीच त्यांनी सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीका केली. येडXX आहे तो. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. महाराष्ट्रात अशा Xत्या लोकांना स्थान नाहीये. ही कीड महाराष्ट्राला लागलेली आहे. कोट्यवधी रुपये गोळा करता आणि त्याला भ्रष्टाचार आहे. हा देश भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपने केला आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला होता.
राऊतांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेली एका पत्रकाराने त्यांच्यासमोर बूम धरला. त्यावर राऊत भडकले. त्यांनी हातवारे करतच पत्रकारांना बूम खाली घ्यायला सांगितला. खाली घ्या खाली. मला हवंय ते मी बोलेन. तुम्हाला हवंय ते मी नाही बोलणार. काय आहे विषय? असा सवाल राऊत यांनी केला. त्यानंतर त्यांना तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, त्याबद्दल सांगा असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटतो. पुढे बोला, असं म्हणून राऊतांनी हा प्रश्न उडवून लावला. मला टू द पॉइंट काय असेल ते विचारा, इकडले तिकडले झाडे हलवत बसायचे नाही, असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
ST Strike: ‘माझे आईवडील, मुलगी आतमध्ये आहेत, प्लीज…’ एसटी कर्मचाऱ्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव
Nana Patole: विजेचे संकट ते तपास यंत्रणांचा गैरवापर; पवार- नाना पटोले भेटीत नेमकी चर्चा काय?