गणेश सोळंकी, बुलढाणा | 11 नोव्हेंबर 2023 : बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची संसदेसोबतची छायाचित्रे तयार करुन सोशल मिडीयात व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणूकीत डच्चू देणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे बुलढाण्यातून लोकसभा लढविण्याबाबत शिंदे गट आणि भाजपामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बुलढाण्याच्या सर्वेक्षणात खासदार प्रतापराव जाधव चौथ्या नंबरला ढकलले गेल्याने शिवसेनेची जागा जाऊ नये म्हणून आपण लोकसभेवर जाण्यास तयार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
13 व्या लोकसभेचा सर्वे भाजपाने केला आहे. त्यात बुलढाण्याची जागा चार नंबरला दाखविली आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नसल्याने ही जागा शिंदे गटाकडून भाजपाला देण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे. परंतू शिवसेना एकनाथ शिंदे गट आपली जागा सोडायला तयार नसल्याने या जागेसाठी सेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा लागला आहे. आम्ही शिवसेनेची जागा भाजपाला द्यायला तयार नाही, आम्ही शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना निवडून आणू असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जर भाजपाच्या म्हणण्याप्रमाणे जाधव निवडून येत नसतील तर लोकसभेसाठी आपण पण तयार आहोत. आमचा पण सर्वे करा. मग समजेल शिवसेना कुठे आणि भाजपा कुठे आहे ? आपण लोकसभा लढवायला तयार नाही.पण अटीतटीची वेळ आली तर आणि खासदार जाधव लढवायला तयार नसतील तर शिवसेनेची जागा राखण्यासाठी आपण तयार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
बुलढाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा गटात स्पर्धा आणि रस्सीखेच सुरु आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे संसदेचे छायाचित्र आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार संजय गायकवाड लोकसभा लढवायला तयार आहे अशा आशयाचे पोस्टर्स समाजमाध्यमातून व्हायरल केले आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये बुलढाण्याच्या जागेवरुण ठिणगी पडलेली असल्याचे म्हटले जात आहे.