मुंबई | 1 मार्च 2024 : या महिन्यात कधीही लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जागा वाटपांपासून ते उमेदवार फायनल करेपर्यंतच्या गोष्टींवर सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. तर, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांबाबतची वेगवेगळी माहितीसमोर येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजितदादा गट आणि शिंदे गटाने कमळावर लढावं असं भाजपचं म्हणणं असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात उलटसुलट विधानंही येत आहे. या सर्व गोष्टींना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.
टीव्ही9 मराठीने लोकसभेचा महासंग्राम कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना शिंदे गट आणि अजितदादा गट कमळावर लढणार का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर फडणवीस यांनीही थेट आणि स्पष्ट उत्तर देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मी तुम्हाला एकच आणि स्पष्ट सांगतो, लोकसभा निवडणुकीत भाजप कमळावर, शिंदे गट धनुष्यबाण आणि अजितदादा घडाळ्यावरच लढणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेणार आहोत. जागांसाठी अडून बसायचं नाही. जो निवडून येईल त्याने ती जागा लढवायची आहे. ज्याला जिंकता येईल त्याने ती जागा लढवावी, हे सूत्र आमचं ठरलं आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांसोबत न्याय होईल. कुणावरही अन्याय होणार नाही. आम्ही संख्येसाठी लढणार नाही. तर मोदींच्यापाठी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला पाहिजे, त्यासाठी आम्ही लढत आहोत. कुणाला किती जागा मिळणार? कोण तिथे निवडून येईल या गोष्टी गौण आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलंय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही फोडाफोडी केलीय का हे विचारण्याऐवजी तुम्ही या विषयाला वेगळ्या पद्धतीने का पाहत नाही. आम्ही पक्ष फोडले म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष वाचवता आले नाही, त्यांची काही तरी कमतरता राहिली असेल ना? असा सवाल त्यांनी केला.
त्यांचे लोकं त्यांच्यासोबत राहत नाहीत. विरोधक नेतृत्वहीन आहेत. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, नियत नाही अशी त्यांची अवस्था आहे. अशा परिस्थितीत जमिनीशी जोडलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची घुसमट होते. नेतृत्वाचा अंधार असेल तर त्यांना काम करावं वाटत नाही. अशावेळी आमच्याकडे कुणी येत असेल तर स्वागतच करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.