गजानन उमाटे, पुणे, नागपूर | 28 ऑक्टोंबर 2023 : ऑक्टोबर हिटमुळे राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले होते. सर्वच जण घामाघूम होत होते. कडक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. परंतु आता गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांचे तापमान घसरले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे उन्हाच्या कडाक्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान पुणे शहराचे नोंदवण्यात आले. तसेच कोकणातील रत्नागिरीत कमाल तापमान सर्वाधिक होते. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान कमी होणार असल्याचे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात सर्वात कमी तापमानची नोंद पुणे शहरात झाली आहे. पुणे शहराचे तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते. यामुळे पुणेकरांना आता गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस होते. मुंबईचे तापमान २४.८ सेल्सिअरपर्यंत आले आहे. महाबळेश्वर १५.६ अंशावर आले आहे. यामुळे महाबळेश्वरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यंटकांना थंडीचा अनुभव येत आहे.
नागपुरात गुलाबी थंडीची सुरुवात झाली आहे. गेल्या तीन- चार दिवसांत नागपूर शहरातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस कमी झाले आहे. नागपूर शहराचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तापमान घसरल्यामुळे नागपूर शहरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालयात रात्री हिटर्स लावले गेले आहे. महाराजबाग प्राणीसंग्रहालयात चार बिबटे आणि दोन वाघ आहेत. तसेच इतर प्राणी आहे. रात्री वाढलेल्या थंडीपासून वाघ आणि बिबट्याचं संरक्षण व्हावं, यासाठी हिटर्स लावले आहेत.
राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडी वाढणार आहे. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. थंडी कमी राहणार असल्याचा परिणाम राज्यातील खरीप हंगामावर होणार आहे. कमी पाऊस आणि कमी थंडी याचा एकंदरीत परिणाम रब्बी हंगामावर होणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.