मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार यांनी बंड केलं आहे. रविवारी राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचा सर्वाधिक फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे. एकच चाल खेळून भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजपाने महाविकास आघाडीला कमकुवत केलय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पर्याय निर्माण केला आहे तसंच 2024 लोकसभा निव़डणुकीसाठी पक्षाची स्थिती अजून बळकट केलीय.
मागच्यावर्षी शिंदे गट शिवसेनेतून फुटला होता. यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या दोन्ही बंडांमध्ये एक फरक आहे. शिवसेनेत फूट पडली, पण त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम झाला नाही. मविआ कमकुवत झाली नाही. त्याचा फटका भाजपाच्या मिशन 45 ला बसत होता.
शिंदे गट सोबत होता, पण….
भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. शिंदे गट सोबत येऊनही उद्दिष्टय साध्य होईल, अशी भाजपासाठी स्थिती नव्हती. अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी निश्चित कमकुवत झाली आहे. त्याचा फायदा भाजपाला महाराष्ट्राच्या अन्य भागात होऊ शकतो.
भाजपा नेत्याने काय गणित सांगितलं?
राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत स्थिती असलेल्या 11 लोकसभा मतदारसंघात भाजपाला फायदा होईल, असं भाजपाच्या एका नेत्याने सांगितलं. “राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एक पूर्ण वेगळा मतदार आहे. त्यांच्या नेत्यांना सोबत घेतल्यामुळे तिथे मविआला फटका बसेल. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आम्हाला प्रवेश करता येईल” असं हा भाजपा नेता म्हणाला.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काय सांगितलेल?
अजित पवार यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याने भाजपाकडे एकनाथ शिंदे यांना पर्याय तयार झाला आहे. त्यामुळे सरकारला आता कुठलाही धोका राहणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एकनाथ शिंदे भाजपासोबत आल्यानंतर म्हणावा तितका परिणाम होत नव्हता. म्हणजे फायदा दिसत नव्हता. मागच्या महिन्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये एक जाहीरात प्रसिद्ध झाली होती. एकनाथ शिंदे यांना त्या जाहीरातीमधून श्रेय दिलं होतं. त्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेदाची दरी रुंदावली होती. आता भाजपाकडे अजित पवार यांच्या रुपाने पर्याय उपलब्ध आहे.