कानपूर : आपल्या मुलीच्या लग्नासाठी इथे आलेल्या महिलेला ट्रकनं चिरडल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी कानपूरच्या नौबस्ता इथल्या हमीरपूर रोडवर हा अपघात झालाय. मधू अवस्थी (52, रा. पुणे) असं महिलेचं नाव असून ती आपल्या पुतण्यासोबत दुचाकीवर आपल्या मुलीच्या लग्नासाठी खरेदीसाठी बाहेर पडली असताना हा अपघात झाला.
आठवडापूर्वीच आले होते
पुण्याचे रहिवासी व्यापारी हरी ओम अवस्थी यांच्या पश्चात पत्नी मधू (५२) आणि दोन मुले प्रिया आणि प्रांशु असा परिवार आहे. हरिओम यांची भाची ज्योती पांडे म्हणाल्या, प्रियाचा विवाह यशोदानगरचे रहिवासी अभियंता किशन द्विवेदी यांच्याशी १२ डिसेंबरला ठरला होता. मुलांनी शहरातच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आठवडाभरापूर्वी ते आपल्या कुटुंबासह शहरात आले होते. मंगळवारी संध्याकाळी उशिरा मधु त्यांचे भाचे आनंद दुबे यांच्यासोबत दुचाकीवरून खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला.
विवाह सोहळा साधेपणानं होणार साजरा
चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. आनंदलाही किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे लग्नाच्या आनंदाचं शोकात रूपांतर झालं आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित भदाना यांनी सांगितलं, की अहवाल नोंदवल्यानंतर चालकाचा शोध सुरू आहे. तर मधू यांच्या पार्थिवावर भैरो घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचबरोबर हा विवाह सोहळा साधेपणानं पार पाडण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतलाय.
रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही
माहिती मिळताच पोलिसांनी 108 क्रमांकाकरून रुग्णवाहिका बोलावली. बराच वेळ थांबूनही रुग्णवाहिका न आल्यानं बसंत विहार चौकीचे प्रभारी राजेशकुमार रावत यांनी दोघांनाही आपल्या कारमधून खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, मधू यांचा आधीच मृत्यू झाला होता.
‘संसार उद्ध्वस्त झाला’
आपल्या मुलीच्या लग्नासाठी आलेले हरी ओम अवस्थी या अपघातामुळे खूप दुखावले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, की आठवडाभरात शहरातल्या धुळीनं आणि वाहतूककोंडीनं हैराण झालो आहोत. लवकर लग्न करून पुण्याला परतायचं होतं. मात्र त्याआधीच या वाहतुकीनं पत्नीचा जीव घेतला.