मुंबईः आमदार रवी राणांवर (Ravi Rana) महाविकास आघाडी सरकार सुडापोटी कारवाई करत आहे. तुमच्या हातात सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाई करू नका, असा हल्ला सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकावर चढवला. विधानसभेत भाजपच्या (BJP) आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरले. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला. तुम्ही सूडबुद्धीने कारवाई कराल, तर तुमचा अनिल देशमुख होईल, असा इशारा त्यांनी दिला. मला विधानसभेत बोलू द्या, अन्यथा मी फाशी घेईन. रवी राणा दिसला की, त्याला गोळ्या घाला, असे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
नेमके प्रकरण काय?
अमरावतीमध्ये महापालिकेची परवानगी न घेता एक पुतळा बसवण्यात आला होता. तो हटवण्यात आला. या वादातून महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक झाली. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यावर 307 चा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. याविरोधात राणा न्यायालयात गेले. त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, आमदार राणांवर लावलेले कलम अतिशय गंभीर होते.
काय आहे कलम 307?
आमदार रवी राणांवर शाईफेक प्रकरणात कलम 307 लावण्यात आले होते. याचा अर्थ म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे. ज्याला हाफ मर्डर असाही शब्द प्रयोग केला जातो. एखाद्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा वेळेस हे कलम लावले जाते. त्यानंतर सदर व्यक्ती मृत झाल्यास आणखी कलम 302 लावले जाते. या कारवाईवरूनच भाजप विधानसभेत आक्रमक झाला आहे.
तर अजित दादांना फासावर द्याल?
आमदार रवी राणांवर चुकीचे कलम लावल्याबद्दल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केले म्हणून अजित दादांना फासावर लटकवाल का, असा सवाल त्यांनी केला. मूळ गुन्हेगारावर किरकोळ कलमे लावली. जो आमदार दिल्लीत त्याच्यावर 307 हे कलम कसे लागू शकते. अशा कारवाया केल्या, तर पोलीस बेछूट होतील. राज्यात काहीच उरणार नाही.
चुकीच्या कारवाया करू नका
आपल्याकडे सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाई करू नका. रवी राणांवर चुकीचे कलम लावले. मात्र, न्यायालयाने त्यांना तात्काळ जामीन मंजूर केला. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यांनी सरकारला धारेवर धरले. भाजपच्या आमदारांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!
युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!