यवतमाळ : विदर्भात शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. यवतमाळची जबाबदारी अरविंद सावंत (Arvind Sawant ) यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार आहेत. तरीही त्या पक्षाच्या अभियानातून बाहेर का, याबाबत विचारलं असता, त्या वैयक्तिक कारणानं बाजूला असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. यवतमाळात शिवसेना नेते (Shiv Sena leader) अरविंद सावंत म्हणाले, भावना गवळी (Bhavana Gawli) या त्याच्या व्यक्तिगत कारणाने बाजूला आहेत. ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांनी स्वतः पक्षाला सांगितले की मला यातून बाजूला ठेवा. माझी मानसिक स्थिती योग्य नाही. मी योगदान देऊ शकत नाही. त्यामुळं त्यांना त्याचे प्रश्न सोडवू द्या, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. अरविंद सावंत म्हणाले, जे सोबत येतील त्यांना घेऊन काम करू. पक्ष वाढवणं हा अजेंडा आहे. इडी कारवाई अहवालावर सावंत म्हणाले, ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय. ते योग्य नाही. बँकेत 2 लाख कोटींचा घोळ झाला. गुजरातची समस्थ श्रीमंत धेंड त्यात आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. इकडं मात्र, इडी कारवाई करते, असा आरोप सावंत यांनी लगावला.
शिवसेनेच्या विदर्भातील अभियानात नागपूरची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे आहे. यवतमाळची जबाबदारी अरविंद सावंत यांच्याकडे, तर गडचिरोलीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. अमरावतीची जबाबदारी गजानन कीर्तीकर यांच्याकडे, तर अकोल्याची जबाबदारी हेमंत पाटील यांच्याकडे आहे. बुलडाणा – संजय जाधव, वाशिम – प्रताप जाधव, भंडारा – प्रियांका चतुर्वेदी, वर्धा – खासदार कृपाल तुमाने यांच्याकडे शिवसेनेच्या संपर्क अभियानाची जबाबदारी आहे. पण, खासदार असतानासुद्धा भावना गवळी मात्र वैयक्तिक समस्या सोडविण्यात व्यस्त आहेत.
नागपुरात खासदार संजय राऊत म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष वाढविण्याचं काम करतोय. भावना गवळी आम्हालाही दिसत नाही. याचा अर्थ त्या शिवसेनेत दिसत नाही असं नाही. त्यांनी रितसर परवानगी घेतली. भावना गवळी आज नाही. त्यांच्यामागे ईडीने जे काही लावलं. त्यामुळं त्यांना कोर्टात जावं लागतंय. महाविकास आघाडीकडे नसलेल्या जागेवर आता आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू. शिवाय विदर्भात 29 भाजपचे आमदार आहेत. त्यावर फोकस करू, असंही संजय राऊत म्हणाले.