नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचंही प्राबल्य दिसून येतं. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेलं लासलगाव, पाटोदा आणि येवला ही महत्त्वाची शहरं या मतदारसंघात येतात. 2008 मध्ये केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईतून सुरू झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते येवला मतदारसंघात राजकीयदृष्ट्या स्थिर झाले. या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे. एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. नंतर तिथे शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. मात्र 2004 मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली. आता भुजबळांकडे मंत्रीपद, निधी, अजित दादा आणि घड्याळ्याचं चिन्हसुद्धा आहे, तरीही येवला मतदारसंघ त्यांच्यासाठी विविध कारणांमुळे आव्हानात्मक ठरणार आहे. मराठा आरक्षण, कांदा प्रश्न आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध ही काही आव्हानं त्यांच्यासमोर आहेत.
छगन भुजबळांचा मुंबईत माझगाव विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्याकडून 1995 आणि 1999 मध्ये पराभव झाला. त्यामुळे मुंबईत यापुढे निभाव लागणं कठीण असल्याचं लक्षात घेत भुजबळांनी आपलं मूळ असलेल्या नाशिक जिल्ह्यात राजकीय बस्तान बसविण्याचा निर्णय घेतला. येवला मतदारसंघातील समस्या आणि जातीय समाजरचना ही आपल्या राजकीय पायाभरणीसाठी योग्य असल्याचं त्यांनी अचूक हेरलं. त्यानुसार त्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. विकासासाठी आसुसलेल्या आणि स्थानिक आपमतलबी राज्यकर्त्यांना कंटाळलेल्या दुष्काळी येवला तालुक्यातील जनतेलाही त्यांचा हक्काचा माणूस हवाच होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत दिसला.
विधानसभा 2004- या निवडणुकीत भुजबलांना 79 हजार 306 मतं मिळाली होती. तेव्हा भुजबळ यांच्या पाठीशी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उभे राहिल्याने शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा त्यांनी 35 हजार 649 मतांनी पराभव केला होता.
विधानसभा 2009- सुरुवातीला भुजबळ यांना साथ देणारे माणिकराव शिंदे हेच 2009 मध्ये त्यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. तरीही भुजबळ यांनी त्यांचा 50 हजार 180 मतांनी पराभव केला. येवला मतदारसंघात आपल्यासमोर कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं.
विधानसभा 2014- छगन भुजबळांना एक लाख 12 हजार मतं मिळाली होती.
विधानसभा 2019- एक लाख 26 हजार मतं मिळाली होती.
2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांना धूळ चारली. छगन भुजबळ यांच्यासाठी आता येवला हा मतदारसंघ जितका आव्हानात्मक बनल्याचं दिसतंय, तितकं ते त्यांच्यासाठी यापूर्वी कधीच नव्हतं. 2004 पासून ते येवला या मतदारसंघातून निवडून येत आहेत. तेव्हापासूनच प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये वाढच झाल्याचं पहायला मिळालं.
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी |
1- छगन भुजबळ | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,26,237 | 62.66% |
2- संभाजी साहेबराव पवार | शिवसेना | 69,712 | 34.61% |
3- अल्गाट सचिन वसंतराव | इतर | 1,858 | 0.92% |
4- नोटा | इतर | 1,027 | 0.51% |
5- महेंद्र गौतम पगार | इतर | 713 | 0.35% |
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी |
1- छगन भुजबळ | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,12,787 | 58.19% |
2- पवार संभाजी साहेबराव | शिवसेना | 66,345 | 34.23% |
3- मानकर शिवाजी माधवराव | भाजप | 9,339 | 4.82% |
4- अहिरा तास करभारी | इतर | 1,101 | 0.57% |
5- वरीलपैकी काहीही नाही | इतर | 876 | 0.45% |
उमेदवाराचं नाव | पक्ष | एकूण मतं | टक्केवारी |
1- छगन भुजबळ | राष्ट्रवादी कॉंग्रेस | 1,06,416 | 63.14% |
2- ॲड. शिंदे-पाटील माणिकराव माधवराव | शिवसेना | 56,236 | 33.37% |
3- अहिरा तास करभारी | इतर | 1,984 | 1.18% |
4- घुगेराव संदीप विश्वनाथ | इतर | 1,641 | 0.97% |
5- दि्वर दिनकर सीताराम | इतर | 1,538 | 0.91% |
छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 128000 मराठा समाज आहे. तर मराठा आरक्षण समर्थकांच्या मते येवल्यात मराठा समाजाची लोकसंख्या 125000 एवढी आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 102000 ओबीसी तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार ओबीसींची संख्या 80000 एवढी आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 18000 मुस्लिम आहेत. तर मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यातील मुस्लिमांची संख्या 25000 एवढी आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार येवल्यात 43000 एससी आणि एसटी आहेत. तर आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार 50000 एससी आणि एसटी आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात इतर वर्गातील 11000 लोक असून मराठा आरक्षण समर्थकांच्या दाव्यानुसार मतदारसंघात 22000 मतदार आहेत.
मराठा आरक्षण, कांदा उत्पादकांची नाराजी, अल्पसंख्याक समाजाची भाजपविषयी असलेली नाराजी, पाणी समस्या, शहरातील अतिक्रमणांकडे होणारं दुर्लक्ष, नाट्यगृहाची दूरवस्था या छगन भुजबळ यांच्याविरोधात जाणाऱ्या काही बाबी आहेत.
निफाड तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं स्वागत हे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी केलं होतं. त्यांनी उघडपणे भुजबळांविरोधात उमेदवारीचीही मागणी केली. याशिवाय माणिकराव शिंदे यांनीही दावेदारी कायम ठेवली आहे. तर ठाकरे गटाकडून आमदार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हेसुद्धा इच्छुक उमेदवारांच्या रांगेत आहेत.
भुजबळ हे सध्या येवला मतदारसंघातील आमदार आहेत. ते सुरुवातीला शिवसेनेत होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. ते सत्तेतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत भाजप-शिवसेनेची सत्ता असताना त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. आता छगन भुजबळ हे मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्तेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांसारखी पदं भूषवत सलग 10 वर्षे त्यांनी नाशिकचं पालकमंत्री म्हणूनदेखील पद भूषवलं होतं.
मराठा समाजः 1 लाख 25 हजार
ओबीसीः 1 लाख 20 हजार
एससी आणि एसटीः 45 हजार
मुस्लीमः 35 हजार
इतरः 10 हजार
2004 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत छगन भुजबळ यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरीत भुजबळ कायम विरोधकांना पुरून उरले. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक भुजबळांच्या याच गुणांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या दृष्टीने येवला विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. एकीकडे शरद पवार यांनी येवला मतदार संघात दौरा केला. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा येवल्यात मोठा मेळावा घेतला होता. यामुळे भुजबळ समर्थक सावध झाले आहेत. यंदाची निवडणूक दोन्ही गटांसाठी अस्तित्वाचा प्रश्न असेल. येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आला आहे. त्यातही महाविकास आघाडीने अधिक जोर लावला तर भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही.