तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही वाईट ठरलो; दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल

| Updated on: Sep 11, 2024 | 9:36 PM

बारामतीत सध्या एका कथितपणे अजित पवार समर्थकाचं पत्र व्हायरल झालं आहे. बारामतीच्या लढतीबद्दल अजित पवारांनी माफी मागितली., मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं., असा प्रश्न या पत्रात विचारला गेला आहे.

तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही वाईट ठरलो; दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
अजित पवार
Follow us on

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर बारामतीत अजित पवार समर्थकाचं एक पत्र व्हायरल झालंय. भावनिक राजकारण न करण्याचा सल्ला देणारे अजित पवारच भावनिक कार्ड का खेळतायत. असा प्रश्न यातून विचारण्यात आला आहे. पत्रात म्हटलंय की, दादा बरे आहात का. हल्ली तुमची काळजी वाटते. दुर्देव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावं लागतंय. कारण नाव कळालं तर पुढे राजकारणात भविष्य
राहिल की नाही, हा प्रश्न आहे. आजकाल तुमचं वागणं-बोलणं-सांगणं आणि ऐकणंही बदललंय. जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय, कधी खदखद व्यक्त करताय, कधी भावनिक होताय, की सहानुभूतीचं कार्ड खेळताय? तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही पवारसाहेबांच्या लेखी वाईट ठरलो.

आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा. तुमच्या निर्णयामुळे दोन गट पडले. त्यात तुम्ही माफी मागून आमचीच पंचाईत केली.याआधी सुनेत्रा पवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वतः घेत कुणाचाही दोष नसल्याचं अजित पवार म्हणाले होते., नंतर मात्र बारामतीत इतकं काम करुनही पराभव झाला., अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली होती.

त्यावरुन पत्रात लिहिलंय की., वहिणींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सर्व जबाबदार आहोत, अशी तुमची भावना झालीय. त्यामुळे कार्यकर्त्यांनाकडे तुम्ही संशयानं पाहणं सहन होत नाही. आम्ही पायाला भिंगरी लावून वहिणींचा प्रचार केला, हे तुम्हाला कसं पटवून देवू. आमची अवस्था ना घर की ना घाट की झाली. ज्या पवारसाहेबांमुळे आम्हाला ओळख-पदं मिळाली, त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्हाला काय मिळालं? तुम्ही हतबल का झालात, कसलं ओझं आहे. गुलाबराव , तानाजी सावंत तुमच्याबद्दल काहीही बरळतायत. त्यावर न बोलता तुम्ही आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं वाईट वाटतंय. पराभवाची सल आम्हालाही आहे. पण जास्त ताणू नका. जोमाने कामाला लागून पुन्हा बारामतीचा गड काबीज करुयात.

एकीकडे हे पत्र व्हायरल झालेलं असताना दुसरीकडे अजित पवारांनी जी प्रचारासाठी एजन्सी नेमलीय, तिच्याच सांगण्यावरुन भाषणं करतात. असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे. त्यात शरद पवारांच्या पक्षाविरोधात निवडणुका लढवायला नकोत., असं मत अजित पवार गटातले अनेक आमदार व्यक्त करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवारांचा प्रचाराचा पॅटर्न पूर्णपणे बदलला हे खरं आहे. मात्र लोकसभेत बारामतीच्या लढाईची सुरुवात अशाच एका व्हायरल पत्रानं झाली होती. आणि यावेळी विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्याच एका विधानानं हे पत्रही चर्चेत आलं आहे.