बापाचा नाद खुळा ! मुलगा १० वेळा नापास तरीही जिद्द कायम; अखेर ११ व्या प्रयत्नात १० वीला गाठलं ‘मॅजिक सक्सेस’

| Updated on: May 28, 2024 | 11:08 AM

दहावीच्या निकालात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे कौतूक केले जाते. मात्र, १० वेळा सर्वच विषयात नापास झाल्यावरही जिद्द न सोडता ११व्या प्रयत्नात ‘मॅजिक सक्सेस’ गाठणाऱ्या एका तरूणाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.

बापाचा नाद खुळा ! मुलगा १० वेळा नापास तरीही जिद्द कायम; अखेर ११ व्या प्रयत्नात १० वीला गाठलं ‘मॅजिक सक्सेस’
११ व्या प्रयत्नात कृष्णाने १० वीला गाठलं ‘मॅजिक सक्सेस’
Follow us on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. दहावीच्या निकालात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे कौतूक केले जाते. मात्र, १० वेळा सर्वच विषयात नापास झाल्यावरही जिद्द न सोडता ११व्या प्रयत्नात ‘मॅजिक सक्सेस’ गाठणाऱ्या एका तरूणाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. आणि त्याहून अधिक कौतुक होतंय ते मुलावर विश्वास दाखवत त्याला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची. त्यांची इच्छा अखेर पूर्ण झालीच आणि त्यांच्या लेकाने ११ व्या प्रयत्नात मॅजिक सक्सेस मिळवले आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबीयालाच नाही तर संपूर्ण गावाला आनंद आहे.

एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभेल अशी ही कहाणी आहे ती परळी तालुक्यामधील. तेथील डाबी गावचे रहिवासी असलेल्या नामदेव मुंडे आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्या अनोख्या जिद्दीच्या कहाणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलाच्या यशामुळे फक्त कुटुंबीयच नव्हे तर गावकरीही आनंदले आहेत. 12 th फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटच्या कथानकाची बीडच्या परळी तालुक्यात पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे.

12 th फेल सारखीच कहाणी

काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला 12 th फेल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हिंदी-भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अत्यंत गरिबीवर मात करणाऱ्या मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी अनुराग पाठक यांच्या २०१९ च्या नामांकित नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रात्मक नाट्य चित्रपटाच्या कथानकाशी अगदी तंतोतंत जुळणारीच कथा वाटावी अशा प्रकारचे सत्य उदाहरण परळी तालुक्यात दहावी परीक्षेच्या बाबतीत बघायला मिळाले आहे.

परळी तालुक्यातील डाबी गावचे रहिवासी असलेल्या सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा सन 2018 या वर्षात दहावीला होता. 2018 साली दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्याचे वडील नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत. संपूर्ण जीवन अतिशय कष्टात व बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवले आहे. काहीही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती. त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही तू पास होईपर्यंत परीक्षा देत रहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली.

जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश आपलेच

वडिलांनी दाखवलेला विश्वास पाहून त्यांच्या मुलाने कृष्णाने परीक्षा देणे, प्रयत्न करणे सुरूच ठेवले. तब्बल दहा वेळा नापास झाल्यानंतर अखेर यावेळी तो पास झाला. सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर यश मिळाले. त्याच्या यशाने वडील सुखावून गेले असून त्यांनाही आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. एवढेच नाही तर संपूर्ण गावाला या यशाचा इतका आनंद झालेला आहे की, कृष्णाने उत्तुंग यश मिळवल्यासारखे अभिनंदन त्याचे संपूर्ण गाव करत आहे. अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला कृष्णा एक प्रकारे सद्यस्थितीला डाबीकरांचा हिरो बनला आहे. कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या आगळ्या वेगळ्या यशाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश आपलेच असते हे कृष्णाच्या वडिलांनी दाखवून दिले आहे. कृष्णाच्या वडिलांचे विशेष कौतुक सर्व स्तरातून होत आहे