मुंबई : औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्यातील राजकारण तापत चाललं आहे. औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत एक व्यक्ती औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत चालल्या आहेत. आज कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुव हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चा हिंसक वळण लागलं.
आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करावा लागला. वातावरण तापलं होतं. जमाव ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले….
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापुरातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. औरंगाजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मनसेचा इशारा काय?
दरम्यान औरंगजेबाच्या मुद्यामध्ये आता महाराष्ट्र नविर्माण सेनेने उडी घेतली आहे. “ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना जिथे औरंग्याला गाडलंय तिथेच गाडावे लागेल” असं इशारा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिलाय.
ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना जिथे औरंग्याला गाडलंय तिथेच गाडावे लागेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 7, 2023
संजय राऊत काय म्हणाले?
“पुण्यात डॉ. कुरुलकर ज्याने पाकिस्तानला भारताची गुपितं विकली. तो आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या विरोधातही मोर्चा काढायला हवा होता. औरंगजेबा इतकाच हा विषय गंभीर आहे. संघाचे काही लोकं पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशाची गुपिते विकली जातात. हनी ट्रॅपमध्ये सापडले जातात. हा विषय कोल्हापूर, नगरमध्ये औरंजेबाचा स्टेट्स ठेवण्या एवढाच गंभीर आहे. राज्यात शांतता राहावी, सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पण या सरकारच्या पायाखालची जमीन सरकत आहे. त्यामुळे ही अस्वस्थता आहे” असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार काय म्हणतात?
औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात दंगल करण्याचं कारण काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही” असं पवार म्हणाले.