मराठीचे आग्रह धरणारे वक्ते, मराठीचे शिक्षक अन् राजकीय नेत्यांचे मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातात. सर्वच मोठमोठ्या अधिकाऱ्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या किंवा बड्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेतात. व्यवस्था राबणाऱ्या या अधिकाऱ्यांचा आपल्या व्यवस्थेवर विश्वास नसतो. परंतु याला अपवाद ठरल्या IAS असलेल्या मनीषा आव्हाळे. सोलापूर जिल्हा परिषद सीइओ मनीषा आव्हाळे यांनी आपल्या मुलीचा जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे. या माध्यमातून त्यांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. तसेच आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सर्वसामान्य पालकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी त्यांची मुलगी ईशा हिचे सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावातील अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला आहे. या अंगणवाडीत शनिवारी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे या आपली चिमुकली ईशा हिला घेऊन पालक सभेला दाखल झाल्या. पालक असल्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी इतर मुलांप्रमाणे ईशाचे फूल देऊन स्वागत केले. तिचे औक्षण करून साखर भरवली. मग ईशासुद्धा अंगणवाडीतील इतर मुलांमध्ये खेळायला लागली. ती त्या ठिकाणी असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी झाली. तसेच तिने अंगणवाडीतील खिचडीही खाल्ली. सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्या व्यवस्थेवर माझा विश्वास अटळ आहे. हे फक्त बोलण्यातून व्यक्त करण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे म्हणून ही सुरुवात केली आहे.
शिक्षणाचा पाया बालपणापासून पक्का होतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्याची सुरुवात अंगणवाडीतून केली जात आहे. त्यासाठी माझी अंगणवाडी आनंदवाडी ही संकल्पना राबविली जात आहे. इतरांना सांगण्यापेक्षा मी माझ्या घरातून सुरुवात करणार आहे. त्यासाठी माझ्या मुलीला जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीतच पाठवले असल्याचे मनीषा आव्हाळे यांनी सांगितले. माझेसुद्धा शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाल्याचे त्यांनी सांगितले.