zumba dance in zp School: शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात. नाशिक जिल्ह्यातील शिक्षकाने असाच वेगळा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या शिक्षकाने शाळेतच झुंबा डान्स सुरु केला आहे. या झुंबा डान्सला अहिराणी अन् खान्देशी लोकगीताची जोड दिली आहे.
एरव्ही विद्यार्थ्यांना शाळेत कवायत व व्यायाम करणे आवडत नाही. त्यावर नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या उंबरधे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अनोखा फंडा शोधून काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढत आहे आणि त्यांच्याकडून शारीरीक कवायती होत आहे. दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक भारत पाटील यांनी त्यासाठी झुंबा डान्स शाळेत सुरु केला आहे. या झुंबा डान्सला त्यांनी अहिराणी व खान्देशी लोकगीतांची जोड दिली आहे. त्या गीताच्या तालावर विद्यार्थी उत्साहात वर्कआऊट करत आहेत.
पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम कवायतीमध्ये होतो. त्याला संगीताची जोड देऊन त्या तालावर हे वर्कआऊट केले जाते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहण्यासह रक्तदाब सुधारतो. कॅलरीज बर्न करता येतात. या प्रकारे अनेक फायदे झुंबा डान्सचे आहेत.
जिल्हा परिषद शाळेत झुंबा डान्स, शिक्षकाच्या भन्नाट कल्पनेचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/GyemGmjvN6
— jitendra (@jitendrazavar) July 14, 2024
दर आठवड्याला वेगवेगळ्या खान्देशी गीते व संगीतासोबत मुलांना मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. शाळेतील सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन मुलांच्या मनात उत्साह निर्माण होऊन शाळेविषयी आपुलकी गोडी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना फायदे कमी अधिक प्रमाणात माहिती असतील नसतील पण आपल्याला नाचायला, उड्या मारायला, मनासारख्या कृती करायला मिळते ना बस्स मग. यामुळे आता दर शनिवारी विद्यार्थी शाळेत हजेरी लावतात. त्यानंतर म्हणतात… सर, झुंबा करू ना…नाचो..नाचो …विथ झुंबा.