नवी दिल्ली : देशात असलेला सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि सातत्याने वाढत असलेल्या कच्च्या मालाचे दर यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तुंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने मजुरीचा देखील खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादकाला आता पूर्वीच्या किमतीमध्ये वस्तूंची विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात फ्रिज, वाशिंग मशिन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या दरामध्ये येत्या एप्रिलपर्यंत पाच ते दहा टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पॅरासॉनिक, एलजी, हायर या कंपन्यांनी या आधीच दरवाढिचा निर्णय घेतला आहे. तर सोनी, हिताची, गोदरेज या कंपन्या देखील लवकरच आपल्या वस्तूंचे दर वाढू शकतात.
कझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अप्लायंसेस मॅनिफ्याक्चरर्स असोसिएशन (CEAMA)ने दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्या येत्या जानेवारी ते एप्रिल या काळात आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याची शक्यत आहे. हायर अप्लायंसेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एन. एस. यांनी याबाबत माहिती देताना पीटीआयला सांगितले की, देशात सध्या सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. कच्च्या मालाचे भाव सासत्याने वाढत आहेत. महागाई वाढल्याने निर्मिती खर्च देखील वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनाचे दर वाढू शकतात. दर वाढल्यास टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशिन अशा सर्वच उत्पादनाच्या किमती वाढतील. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. तसेच कोरोना काळात उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याने कंपन्यांना मोठा फटका बसला होता. आता हळूहळू कोरोनाचे सावट कमी होत असल्याने उद्योग-धंद्यांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्या काही प्रमाणात उत्पादनाचे दर वाढून झालेला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात वस्तूंचे दर महागण्याची शक्यता आहे.
‘क्रिप्टो’ फर्म ईडीच्या रडारवर: कर नियमांसाठी केंद्राकडे धाव, अर्थसंकल्पात स्पष्टीकरणाची मागणी!