नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाचा उमेदवार (President Election) ठरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे सर्वसंमतीने एकच उमेदवार दिला जावा म्हणून भाजप नेते राजनाथ सिंह विरोधकांशी चर्चा करत आहेत. काँग्रेस (Congress) आणि भाजपने (BJP) अद्याप राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, बिहारमध्ये राहणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या लालूप्रसाद यादव यांचा आरजेडीशी काही संबंध नाही. हे सारण येथील राहणारे एक गृहस्थ आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. मुंबईच्या अंधेरीतील एका दाम्पत्यानेही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरला आहे. येत्या काळात अजूनही काही उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महात्मा गांधी यांचे पणतू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाल कृष्ण गांधी यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सूचवलं होतं. या शिवाय त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचंही नाव सूचवलं आहे. या आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र, पवारांनी त्यास नकार दिला. राष्ट्रपतीपदासाठी 29 जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. तोपर्यंत काँग्रेस आणि भाजपकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर होतील. बुधवारी 11 जणांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एकाने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दहा उमेदवार रिंगणात आहेत.
बुधवारी 11 जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले. त्यातील एकाचा अर्ज बाद झाला आहे. नामांकन अर्ज भरताना द्यावयाच्या दस्ताऐवजातील चुकीमुळे हा अर्ज बाद करण्यात आला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम 1952च्या कलम 5ब(4) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूरज मोहन यांनी दिली. उमेदवाराने दिलेल्या कागदपत्रातील माहिती आणि उमेदवाराच्या मतदारसंघातील यादीतील माहितीत तफावत होती. त्यामुळे हा अर्ज बाद करण्यात आला आहे.
डॉ. के पद्मराजन, सीलम,तामिळनाडू
जीवनकुमार मित्तल, मोतीनगर, दिल्ली
मोहम्मद ए हामिद पटेल, अंधेरी, मुंबई
सायराबानो मोहम्मद पटेल, अंधेरी, मुंबई
टी. रमेश, सेल्लाप्पमपट्टी, तामिळनाडू
श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
प्रा. डॉ. दयाशंकर अग्रवाल, जीटीबी नगर, दिल्ली
ओम प्रकाश खरबंदा, नवीन शाहदरा, दिल्ली
लालूप्रसाद यादव, सारण, बिहार (राजद प्रमुख नव्हे)
ए. मणिथन, अग्रहारम, तामिळनाडू
डॉ. मंदति तिरुपती रेड्डी, मराकपूरर, आंध्रप्रदेश