5 बायका, 6 पुरूष… रेल्वे स्थानकावर 11 जणांना पाहून पोलिसांचं माथच भडकलं, असं काय घडलं?

| Updated on: Jul 03, 2024 | 11:51 AM

त्रिपुराच्या अगरतळा रेल्वे स्थानकात पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकातून 11 लोकांना अटक केली. त्यात 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. या 11 लोकांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. पोलीस त्यांच्या मागावरच होते. खबऱ्यांनी टीप दिल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी अगरतळा रेल्वे स्थानकात दबा धरून बसले होते.

5 बायका, 6 पुरूष... रेल्वे स्थानकावर 11 जणांना पाहून पोलिसांचं माथच भडकलं, असं काय घडलं?
Follow us on

त्रिपुराच्या अगरतळा रेल्वे स्थानकावर मोठी धांदल उडताना दिसली. रेल्वे स्थानकावर पोलीस एकाचवेळी 11 लोकांना बेड्या घालून जाताना दिसले. यात 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना अटक केलेलं पाहून आणि त्यात महिलांचाही मोठा समावेश पाहून सर्वच प्रवाशी हैराण होते. नक्की झालंय काय? याचा अंदाज येत नव्हता. जो तो कुजबूज करत होता. या लोकांनी चोरी केली की खून केला? की घरातून पळून आले? की हे पाहिजे आरोपी आहेत? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, जेव्हा या लोकांबाबतची माहिती मिळाली तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या सर्वच्या सर्व 11 लोकांवर पोलिसांची आधीच नजर होती. ते अगरतळा स्टेशनवर येतील अशी माहिती पोलिसांना लागली होती. हे लोक स्टेशनवर येताच पोलिसांनी त्यांना घेरलं. या सर्वांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं. तेव्हा मात्र ते गांगरले. त्यांच्याकडे एकही ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे ते ओळखपत्र दाखवू शकले नाहीत. जेव्हा पोलिसांनी या लोकांची कसून चौकशी केली तेव्हा कळलं की हे सर्वच्या सर्व लोक बांगलादेशी नागरिक आहेत. अवैधरित्या ते त्रिपुरात घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारी कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुप्त माहिती मिळाली अन्…

त्रिपुरा पोलिसांच्या मते त्यांना या लोकांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. सिपाहिजाला जिल्ह्यात काही बांगलादेशी नागरिक आंतरराष्ट्रीय सीमा पार करून अगरतळा रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारीच या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अगरतळा रेल्वे स्थानकात पोलिसांनी पहारा ठेवला. दुसरीकडे या लोकांना इतरत्र शोधण्याचंही जोरदार अभियान सुरू होतं.

नोकरीसाठी आले

या प्रकरणी प्रभारी तपास अधिकारी तापस दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही अगरतळा रेल्वे स्थानाकातून 11 लोकांना पकडलं आहे. त्यात पाच महिलांचा आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यांना चौकशीसाठी अगरतळा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांची कसून चौकशी केली असता ते बांगलादेशी असल्याचं उघड झालं. त्यांच्याकडे कोणतेही दस्ताऐवज नसल्याचंही उघड झालं, असं तापस दास यांनी सांगितलं. हे सर्व लोक नोकरीच्या शोधासाठी भारतात आले होते. अगरतळा ट्रेन पकडून ते ओडिशा, कोलकाता किंवा बंगळुरूमध्ये जाण्याचा विचार करत होते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, अगरतळा रेल्वे स्थानकावर बांगलादेशी नागरिकांनी घुसण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. दोन दिवसापूर्वीच दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पकडलं होतं. हे दोन्ही बांगलादेशी नागरिक कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात होते. त्याआधी 26 जून रोजी याच स्टेशनवर चार बांगलादेशी महिलांसहीत पाच लोकांना पकडलं होतं. त्याच्या तीन दिवस आधी अगरतळा रेल्वे स्थानाकात सहा महिला आणि नऊ बांगलादेशींना पकडण्यात आलं होतं. हे लोक नोकरीच्या शोधासाठी भारतात आले होते.