देशात सगळीकडेच उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी देखील संपूर्ण देशात पसरण्यासाठी आणखी १० ते १५ दिवस लागणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. पण त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. शनिवारी मतदानासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर उन्हामुळे जीव गेला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तीन जिल्ह्यांत 11 मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. मिर्झापूरमध्ये सर्वाधिक सात मतदान कर्मचाऱ्यांना उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने मृत्यू झालाय. सोनभद्र जिल्ह्यात तीन मतदान कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाराणसीमध्ये एका मतदान कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. तर अनेकांची प्रकृती बिघडल्याचं देखील समोर आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मृत्यू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये बहुतेक कर्मचारी ही वय वर्ष ५० च्या वरचे आहेत. निवडणुकीचं साहित्य घेऊन जबाबदारी दिलेल्या बुथ वर जाण्यासाठी हे सर्व कर्मचारी निघाले होते. पण उन्हाचा तडाखा बसल्याने ११ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे.
सोनभद्रमध्ये तिघांचा मृत्यू झालाय. निवडणूक ड्युटीसाठी हे सर्वजण आपआपल्या बुथवर आले होते. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अनेकांना ताबडतोब रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. पण अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आपली निवडणूक ड्युटी बजावताना उष्माघाताचा अनेकांना त्रास झाला. अनेक कर्मचारी बेशुद्ध देखील झाले. अनेकांवर आता उपचार सुरु आहेत.
शनिवारी लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये ५७ जागांवर हे मतदान पार पडणार आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या 13 जागा, पंजाबमधील 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशाच्या 6, हिमाचल प्रदेशच्या 4 जागा, झारखंडच्या 3 आणि चंदीगडची 1 अशा 57 जागांसाठी मतदान होणार आहे.