उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात आज एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास डिब्रूगढ़ एक्सप्रेस (15904)चे सुमारे 12 डब्बे रुळावरून घसरले. ही एक्सप्रेस चंदीगडवरून डिब्रुगढला जात होती. तेव्हा हा अपघात झाला. झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकाच्या तीन किलोमीटरच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून 27 प्रवाशी जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अफघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आले असून बचावकार्य सुरू आहे.
चंदीगडहून ही ट्रेन निघाली होती. गोंडापासून 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दोन बोगी रुळावरून उतरल्या. त्यामुळे रुळ उखडली गेली. हा अपघात झाल्याने अनेकजण भयभीत झाले. गाडीतील सामान भराभरा अंगावर पडल्याने कुणाच्या डोक्याल, कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला जबर मार लागला. काहींच्या बॅगा हरवल्या तर काहींच्या सुटकेस मिळेनाशा झाल्या. अपघात होताच प्रवाशांनी एकच आक्रोश केला. आपण जगू की नाही? असं त्यांना सुरवातीला वाटलं. पण सुदैवाने चार प्रवासी वगळता सर्वांचे प्राण वाचले. या अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची माहिती घेतली असून तात्काळ रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे पूर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आसाम सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार एकमेकांच्या संपर्कात असून प्रवाशांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या अपघाताचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात अपघाताची परिस्थिती दिसून येते. एक्सप्रेसचे कोच पलटी झाले आहे. दोन्ही कोच एसी आहेत. या डब्ब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांनी सर्वात आधी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केलं. जिल्हा प्रशासन आणि रेल्वेची टीमही मदतकार्य करत आहे. एसी कोचमध्ये फसलेल्या लोकांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढलं जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून प्रवाशांना कशी मदत केली जात आहे हे दिसत आहे.
वाणिज्यिक नियंत्रण- 9957555984
फुरकेटिंग (एफकेजी)- 9957555966
मरियानी (एमएक्सएन)- 6001882410
सिमलगुरी (एसएलजीआर)- 8789543798
तिनसुकिया (एनटीएसके)- 9957555959
डिब्रूगढ़ (डीबीआरजी)- 9957555960
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी 40 मेडिकल टीम पाठवण्यात आल्या. तर 15 रुग्णवाहिकाही घटनास्थली दाखल झाल्या. किरकोळ जखमींवर तिथल्या तिथेच उपचार केले जात आहेत. तर गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केलं जात आहे.