आग्रा | 21 ऑगस्ट 2023 : पाटणाहून कोटाला जाणाऱ्या पाटणा-कोटा एक्सप्रेसमध्ये दोन प्रवाशांचा अचानक मृत्यू झाला आहे. या एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांची तब्येत अचानक बिघडली अन् बघता बघता दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रवाशांचा मृत्यू डिहाड्रेशनमुळे झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आग्रा रेल्वे मंडळाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक वीरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. मात्र, अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी भाविक होते. 90 लोकांचा एक जत्था छत्तीसगडहून तीर्थयात्रेसाठी ट्रेनने रवाना झाला होता. या जत्थ्यात सामील झालेल्या काही लोकांना अचानक बरं वाटेनासं झालं. त्यांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. एकूण आठ लोकांना हा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशांची धांदल उडाली. या सहा जणांसमोर प्रवाशांची एकच गर्दी झाली. मात्र, अत्यंतिक त्रास झाल्याने दोन प्रवाशांनी जागेवरच प्राण सोडले. त्यामुळे रेल्वेतील प्रवासी एकदम घाबरून गेले.
दोन प्रवाशांनी जागेवरच जीव सोडल्याने प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सहा प्रवाशांची तब्येत अजूनच बिघडत चालल्याने तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर यातील पाच जणांना आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका रुग्णाला एसएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं आहे.
आग्रा रेल्वे मंडळाचे सहाय्यक प्रबंधक वीरेंद्र सिंह यांनीही या घटनेची पृष्टी केली आहे. पाटणा-कोटा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची तब्येत बिघडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही तात्काळ एक वैद्यकीय टीम रवाना केली. पण टीम पोहोचण्याआधीच दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर पाच प्रवाशांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे, असं वीरेंद्र सिंह यांनी सांगितलं.
आग्रा डिव्हिजनच्या उत्तर मध्य रेल्वेचे पीआरओ प्रशस्ती श्रीवास्तव यांनीही याबाबतची माहिती दिली. काही प्रवासी आजारी पडल्याची माहिती आम्हाला रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरवरून मिळाली होती. सर्व प्रवाशा एसी कोचमध्ये होते. रेल्वे आग्रा कँट रेल्वे स्थानकाजवळ येत असताना एका 62 वर्षीय महिलेचा आणि एका 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर पाच प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.