लखनऊ: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. कानपूरमध्ये सर्वाधिक थंडी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हृदयविकार येण्याचे प्रकार वाढले आहेत. काल कानपूरच्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये 723 रुग्ण उपचारासाठी गेले होते. त्यापैकी 40 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचं आढळून आलं आहे. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं आहे. संपूर्ण शहरात थंडीमुळे हार्ट आणि ब्रेन अटॅक येऊन आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.
हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. रुग्णालयात आलेल्या 723 पैकी 39 रुग्णांचं ऑपरेशन करण्यात आलं. एका रुग्णाची अँजिओग्राफी करण्यात आली. तर सात रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
तसेच शहरातील ब्रेन आणि हार्ट अटॅकमुळे दगावलेल्यांचा आकडा 25 वर गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मृतांमध्ये 17 जण कार्डिओलॉजीच्या एमर्जन्सीपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडून त्यांचा मृत्यू झाला, अस डॉक्टरांनी सांगितलं. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तज्ज्ञांच्या मते जानेवारी महिन्यात प्रचंड थंडी पडली आहे. लोकांच्या हृदय आणि मेंदूवर या थंडीचा प्रचंड परिणाम झाला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कडाक्याच्या थंडीमुळे अचानक रक्तदाब वाढल्याने नसांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. त्यामुळे हृदय आणि मेंदूला रक्त पुरवठा होऊ न शकल्याने अनेकांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक आला आहे.
कडाक्याच्या थंडीत रुग्णांनी स्वत:ची काळजी घ्यावी. गरज असेल तरच बाहेर पडा. कान, नाक आणि डोक्याला झाकूनच बाहेर पडा. 60 वर्षांवरील लोकांनी शक्यतो घराबाहेर पडूच नका.
कारण रात्री जेव्हा थंडी पडते तेव्हा रक्त हृदयापर्यंत जाण्याऐवजी आतड्यांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे हलका आहार घ्या. जेणेकरून रक्त हृदयापर्यंत पोहोचेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
लखनऊच्या हवामान विभागाच्यानुसार, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाल्याने शीत लहर आली आहे. पुढील तीन चार दिवस कडाक्याच्या थंडीत फारसा बदल होण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील पश्चिम आणि पूर्वेकडील भागात शीतलहर आली आहे. अनेक ठिकाणी दाट धुके दाटल्याने लोकांना बाहेर पडणं मुश्किल झालं आहे.