EXPLAINER : 28 घोडे पण सारथी नाही, भेट पक्षांची मनांची नाही, तरच इंडिया आघाडीची शक्ती टिकेल…

| Updated on: Dec 19, 2023 | 8:26 PM

अधीर रंजन चौधरी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते आहेत तर मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या विधानावरून असे दिसते की ही लढाई इंडिया आघाडीची नव्हे तर केवळ पक्षाची लढाई आहे.

EXPLAINER : 28 घोडे पण सारथी नाही, भेट पक्षांची मनांची नाही, तरच इंडिया आघाडीची शक्ती टिकेल...
INDIA AGHADI MEETING IN DELHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीच्या 28 पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक नवी दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये झाली. या बैठकीला कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तृणमूलच्या ममता बनर्जी, सपाचे अखिलेश यादव, बिहारचे लालुप्रसाद यादव, नितीशकुमार असे महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत इंडिया आघाडीचे समन्वयक कोण असतील ठरण्याची शक्यता होती. मात्र. त्याचा निर्णय झाला नाही. तसेच, जागा वाटपाचाही अंतिम निर्णय झाला नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आघाड्यांमधील जागावाटप राज्य पातळीवर होईल. हा फॉर्म्युला चालला नाही, तर आम्ही सर्व मिळून निर्णय घेऊ असे म्हटले आहे. यामुळे इंडिया आघाडीची अवस्था ही 28 घोडे पण सारथी नाही. भेट पक्षांची पण मनांची नाही अशीच झाली आहे.

नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी शिवसेनेने (ठाकरे गट) इंडिया आघाडीचा समन्वयक नेमणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी केली होती. मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान ही मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे कॉंग्रेसने दुर्लक्ष केले होते. यामागे पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे कारण दिले गेले. या निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळेल अशी आशा होती. मात्र, निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेसच्या आशा मावळल्या आहेत. तर, दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटका पक्षांनी आपला वेगळाच सुरु आळवायला सुरवात केली आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून काँग्रेसला टोला लगावण्यात आला. काँग्रेस 138 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. पण, येत्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान 150 जागा जिंकण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला पाहिजे असा सल्ला देण्यात आलाय. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच हा सल्ला देण्यात आलाय. तर, पाटणा, नवी दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये राजकीय पेच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीत केवळ पक्ष भेटले, नेते भेटले पण, त्याने मन एकमेकांशी जुळले नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारत आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल असे म्हटले होते. तर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी आम्ही आमची लढाई पश्चिम बंगालमध्ये लढत आहोत. पश्चिम बंगाल, दिल्ली आम्ही सर्वत्र लढत आहोत. काँग्रेस भारतीय आघाडीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत प्रत्येक पक्षाच्या आपापल्या मागण्या असतील. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि आम आदमी पार्टीसोबत दिल्लीतील जागावाटप आम्ही करू असे त्यांनी म्हटले आहे.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे जागावाटप फॉर्म्युला राज्य पातळीवर चालला नाही तर सर्व मिळून याबाबत निर्णय घेऊ. दिल्ली आणि पंजाबचा प्रश्न कसा सोडवायचा याचा नंतर विचार केला जाईल. दिल्ली, पंजाब यासारखी जटिल राज्ये नंतरच्या टप्प्यात घेतली जातील असे त्यांनी स्पष्ट केलेय.

अधीर रंजन चौधरी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते आहेत तर मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या विधानावरून असे दिसते की ही लढाई इंडिया आघाडीची नव्हे तर केवळ पक्षाची लढाई आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची आघाडी आहे. मध्यप्रदेश निवडणुकीत कॉंग्रस, अखिलेश यादव यांनी स्वतंत्र उमेदवार दिले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांची मोठी ताकद आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आहेत. नितीश कुमार आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची मोठी शक्ती आहे. त्यामुळे त्या त्या राज्यांमध्ये जागावाटप योग्य रीतीने झाले तरच इंडिया आघाडीची ही शक्ती टिकणार आहे. मात्र, प्रत्येक पक्ष आपल्याला किती जागा मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची आजची बैठक म्हणजे पक्ष मिळाले, नेते भेटले पण मने जुळली नाहीत अशीच होती असे म्हणता येईल.