अनंतनाग | 16 सप्टेंबर 2023 : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सलग चौथ्या दिवशी अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांना सळो की पळो करून सोडलं जात आहे. कोकरनाग जंगलात हे अतिरेकी लपले असून त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलाने ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव सुरू केला आहे. तसेच रॉकेट लॉन्चरद्वारेहही बॉम्ब वर्षाव केला जात आहे. हा बॉम्ब वर्षाव होताच अतिरेक्यांची घाबरगुंडी उडाली आहे. अतिरेकी जीवमुठीत घेऊन पळताना दिसत आहेत. सुरक्षा दलाने आता पर्यंत तीन ते चार अतिरेक्यांना जंगलातच घेरलं आहे. तीन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना तीन जवान शहीद झाले होते. त्यात लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील डीएसपी हुमायूं भट यांचा समावेश आहे.
भारतीय सुरक्षा दलाच्या माऱ्यानंतर हे अतिरेकी जंगलातून पळताना दिसले. या अतिरेक्यांनी जमिनीत तळ निर्माण केला होता. ते जमिनीत तळ ठोकून बसले होते. मात्र, सुरक्षा दलाने या तळांवरच जबरदस्त हल्ला चढवून ते उद्ध्वस्त केले आहेत. या अतिरेक्यांविरोधात लष्कराचं ऑपरेशनही सुरू आहे. जोपर्यंत अतिरेक्यांचं नामोनिशना मिटत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्यांच भारतीय लष्कराने म्हटलं आहे.
अनंतनागच्या कोकरनाग जंगलात अतिरेक्यांसोबत सुरक्षा दलाची चकमक सुरू आहे. ही चकमक करताना अडचणी येत आहेत. घनदाट जंगल असल्याने जवानांना अतिरेक्यांवर अचूक प्रहार करण्यात अडचणी येत आहे. सर्व अतिरेक्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. पोलीस दलासह पॅरा कमांडोही या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले असून ते अतिरेक्यांना शोधून शोधून कंठस्नान घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज या सर्व अतिरेक्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाकडून या जंगलात अजून बॉम्ब वर्षा करण्याची शक्यता आहे. हे ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आहे. लष्कर कमांडर उजैर खान एका अतिरेक्यासोबत लपलेला असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या ठिकाणी हे ऑपरेशन सुरू आहे. तो एक दुर्गम डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी काल रात्रभरही ऑपरेशन सुरू होतं.
सुरक्षा दलाने या ऑपरेशनचे एक ड्रोन फुटेज उघड केलं आहे. त्यात अतिरेकी पळताना दिसत आहे. तर अजून तीन ते चार अतिरेकी या जंगलात दबा धरून बसले आहेत. त्यांनाही यमसदनी पाठवलं जाणार आहे. त्यासाठी जंगलात मोर्टार डागले जात आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे.
सुरक्षा दलाने आतापर्यंत या जंगलातील तीन ते चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. भारतीय लष्कराला अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये यश आलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (काश्मीर) विजय कुमार यांनी दिली आहे. 2020 नंतरचा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये 30 मार्च 2020 मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात पाच जवान शहीद झाले होते.