जयपूर: जयपूरच्या (Jaipur) दूदू परिसरातील विहिरीत तीन गर्भवती महिलांसहीत पाच मृतदेह (Jaipur Suicide Case) काढण्यात आले. त्याच विहिरीत रविवारी दुपारी आणखी एका नवजात बालकाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन सख्ख्या बहिणींनी सासरच्या जाचाला कंटाळून दोन मुलांसह विहिरीत उडी मारून जीव दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून नवजात अर्भकांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत. यातील एका मृत महिलेची डिलिव्हरी एक दोन दिवसातच होणार होती. तिच्या पोटातील बाळही दगावलं आहे, असं पोलिसांनी (police) सांगितलं. मात्र, एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.
जयपूरच्या दुदू परिसरातील तीन सख्या विवाहित बहिणींसह दोन नवजात अर्भकांचे मृतदेह विहिरीत सापडले होते. मृतांमध्ये आकाच कुटुंबातील तीन विवाहित बहिणी आणि दोन मुलांचा समावेश होता. मृत महिला गरोदर होत्या. हे पाचही जण 25 मेपासून गायब होते. या मृतांमध्या काली देवी (वय 27), ममता मीणा (वय 23) आणि कमलेश मीणा (वय 20) यांचा समावेश आहे. हर्षित (वय 4 वर्ष) आणि एका 20 दिवसाच्या अर्भकाचाही समावेश आहे. काली देवी या दोन मुलांच्या आई होत्या. ममता ही आठ महिन्यांची गर्भवती होती. सर्वात लहान कमलेश या नऊ महिन्याच्या गरोदर होत्या. एक दोन दिवसातच त्यांची डिलिव्हरी होणार होती, असं पोलिसांनी सांगितलं.
दूदू परिसरातील छप्या गावातील या तिन्ही बहिणींचं कमी वयात लग्न झालं होतं. 2005मध्ये त्यांचा विवाह झाला होता. या तिन्ही बहिणींना एकाच कुटुंबात दिलं होतं. या तिघींचे पती शेती करतात. या तिघी बहिणींचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. त्यामुळे या तिघींनी आयुष्य संपवण्याचं ठरवलं. त्यानंतर या तिघींनी घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नरैना रोडवरील विहिरीत उडी मारून जीव दिला, पोलिसांनी सांगितलं.
रविवारी डॉक्टरांनी या महिलांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आहे. गर्भवती महिलेच्या मृतदेहाचंही शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या महिलेचा गर्भात झाला असावा असा अंदाज डॉक्टर वर्तवत आहेत. या महिलांनी विहिरीत उडी मारून जीव दिल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. मात्र, नवजात बालकांचे मृतदेह पाण्यावर तरंगले नव्हते. त्यामुळे संपूर्ण विहिरभर शोधाशोध करण्यात आली होती, असं पोलिसांनी सांगितलं.
या विहिरीभोवती जवानांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनाच या नवजात बालकाचा मृतदेह दिसून आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच या विहिरीतून पाणी काढण्यात आलं असून विहीर झाकून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, विहिरीत नवजात अर्भकांचे मृतदेह काही तरुणांनी पाहिल्याचं मीणा समाजाचे नेते फूलचंद मीणा यांनी सांगितलं. या तरुणांनीच पोलिसांना माहिती दिली होती, असंही ते म्हणाले. या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे. त्याचा विरोध केला जाणार असून आंदोलन केलं जाणरा आहे. तसेच या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, अशी मागणीही करण्यात आली आहे.