नवी दिल्ली | दि. 1 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार 75,021 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, छतावर सौरऊर्जा संयंत्रे (रूफ टॉप सोलर) बसवण्याची ही योजना आहे. या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 30,000 रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 60,000 रुपये अनुदान मिळेल. 3 किलोवॅटसाठी 78000 रुपये अनुदान मिळणार आहे. ज्यांनी आपल्या घरावर सौरउर्जा संयंत्रे लावली आहेत, त्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.
रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळणार आहे. रेपो रेटपेक्षा फक्त 0.5 % जास्त व्याज त्यासाठी द्यावा लागणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलोवॅटसाठी 18000 प्रती किलोवॅट अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती.