हैदराबाद: ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्यामुळे हैदराबादमध्ये सात कोरोना रुग्णांचा (Coronvirus) प्राणवायूअभावी तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादच्या किंग कोटी या सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला. रविवारी दुपारपासून रुग्णालयातील ऑक्सिजनचा दाब कमी झाला होता. त्यामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर मागवण्यात आला होता. त्यानंतर हा टँकर रुग्णालयाच्या दिशेने रवानाही झाला होता. मात्र, मध्येच वाट चुकल्यामुळे हा ऑक्सिजन टँकर बराच काळ रस्त्यातच रेंगाळत राहिला. (7 Covid patients die in Hyderabad hospital as oxygen tanker loses way)
तोपर्यंत रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. त्यामुळे ऑक्सिजनचा दाब आणखी खाली गेला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी वेगाने हालचाली करुन हा टँकर नक्की कुठे आहे, हे शोधून काढले आणि तो रुग्णालयापर्यंत आला. मात्र, तोपर्यंत अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्या 7 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या ऑक्सिजन टँकरला ग्रीन कॉरिडोअर का उपलब्ध करुन देण्यात आला नव्हता, ही मुख्य शंका आहे. मात्र, स्थानिक प्रशासन या सगळ्यासंदर्भात मौन बाळगून आहे. त्यामुळे ऑक्सिजन टँकर रुग्णालयात येण्यास उशीर का झाला, याचे नेमके उत्तर अद्याप मिळालेले नाही.
देशातील अनेक भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन अलहाबाद उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील सरकारी यंत्रणांची कानउघडणी केली होती. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होणे, हे गुन्हेगारी कृत्य नरसंहारापेक्षा कमी नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाने 12 सदस्यीय राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली होती. देशातील ऑक्सिजन उपलब्धता आणि पुरवठ्याचे मूल्यांकन आणि वितरण यासंदर्भात शिफारस करण्याचे काम टास्क फोर्सकडे सोपवण्यात आले होते. ही मोदी सरकारसाठी मोठी चपराक असल्याचे मानले जाते.
संबंधित बातम्या:
ग्रामीण भागात कोरोना वाढला, महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने पाठवली मोठी आर्थिक रसद
आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ
आमच्यावर विश्वास ठेवा, सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार
(7 Covid patients die in Hyderabad hospital as oxygen tanker loses way)