असा अपघात पहिल्यांदाच घडला, उभ्या ट्रकमध्ये कार घुसली; 7 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 30, 2023 | 7:44 AM

काल रात्री कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे.

असा अपघात पहिल्यांदाच घडला, उभ्या ट्रकमध्ये कार घुसली; 7 जणांचा मृत्यू
Banda Accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात गुरुवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला आहे. अत्यंत वेगात आलेली बोलेरो कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे या कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारा हा अपघात होता. या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बांदा जिल्ह्यातील बबेरू पोलीस ठाण्याअंतर्गत बांदा कमासिन रोडवर हा अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा एक बोलेरो आठ लोकांना घेऊन जात होती. ही बोलेरो अत्यंत वेगात होती. बांदा-कमासिन रोडवर एक ट्रक उभी होती. या कारने थेट ट्रकलाच धडक दिली आणि कार ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कार अत्यंत वेगात ट्रकला धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांनी घराच्याबाहेर धाव घेतली. त्यावेळी त्यांना कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचं दिसलं.

हे सुद्धा वाचा

कारचा दरवाजा कटरने कापला

त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण कारचा इतका चक्काचूर झाला होता की कारमधून माणसं बाहेर काढणं अवघड झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी कटर मागवली आणि कारचा दरवाजा कापून काढला. त्यानंतर सर्व जखमींना कारमधून बाहेर काढलं आणि त्यांना स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले. या अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकच जण वाचला आहे. पण त्याचीही प्रकृती गंभीर असून डॉक्टर त्याला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत.

जखमीची प्रकृती चिंताजनक

या अपघातानंतर डीएम दुर्गा शक्ती नागपाल आणि एसपी अभिनंदन यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बांदा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे, असं डीएम दुर्गा शक्ती नागपाल यांनी सांगितलं. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचंही नागपाल यांनी सांगितलं.

ड्रायव्हरला डुलकी लागली

अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार अत्यंत वेगाने येत होती. ही कार अनियंत्रित झाली अन् या कारने ट्रकला धडक देत ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे हा अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा असं नागपाल यांनी सांगितलं.