स्कॉटलंडमधील (Scotland) ग्लासगो (Glasgow) या शहरातील संग्रहालयांनी भारत सरकारबरोबर चोरीच्या सात वस्तू परत आणण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली आहे. ग्लासगो लाइफ या संग्रहालयाचे संचालन करणाऱ्या सेवाभावी संस्थेने या वर्षाच्या सुरवातीस या कलाकृती परत सोपवण्यास दुजोरा दिला होता. ब्रिटनमधील (Brittan)भारतीय उच्चायुक्त कार्यवाहक सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरी ॲंड म्युझियम (Kelvin grove art gallery and museum) येथे मालकीहक्क समारंभाच्या हस्तांतरणाच्या वेळी हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर करण्यात आला होता. यावेळी बोलताना सुजित घोष यांनी सांगितले की, ‘ ग्लासगो लाइफ सोबत झालेल्या आमच्या भागीदारीमुळे, ग्लासगो संग्रहालयांमधील भारतीय कलाकृती भारतात परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. या कलाकृती आपल्या संस्कृतीच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत आणि आता त्या घरी परत येऊ शकतील. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले, त्या सर्व भागधारकांचे कौतुक करतो, विशेषत: ग्लासगो लाइफ आणि ग्लासगो सिटी काऊन्सिल यांचेही आम्ही कौतुक करू इच्छितो,’ असेही घोष यांनी नमूद केले.
19 व्या शतकादरम्यान उत्तर भारतातील विविध राज्यातील मंदिरांमधून बहुतांश वस्तू हटवण्यात आल्या होत्या. तर एक वस्तू त्याच्या मालकाकडून चोरी झाल्यानंतर खरेदी करण्यात आली होती. ग्लासगो लाइफने दिलेल्या माहितीनुसार, ग्लासगोच्या संग्रहालयात सातही कलाकृती भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. या संग्रहालयातील संग्रहाचे प्रमुख डंकन डोर्नन यांनी सांगितले, ‘ भारतीय पुरातन वस्तूंच्या मालकीचे हस्तांतरण हे ग्लासगोसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतीय उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तालयाने दिलेले सहकार्य आणि पाठिंब्यासाठी त्यांना श्रेय दिले पाहिजे. या कलाकृती सुरक्षितपणे परत करण्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांसोबत आमचे काम सुरू ठेवण्यासाठी तत्पर आहोत’, असेही डोर्नन यांनी नमूद केले.
ब्रिटनमधून 7 कलाकृती भारताला परत मिळत असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली होती. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ’14 व्या शतकातील भारतीय- फारसी तलवार आणि 11 व्या शतकातील कोरीव काम केलेली दगडी दरवाज्याची चौकट यासह 7 कलाकृती भारतात परत आणल्या जातील,’ असे रेड्डी यांनी नमूद केले होते.
Repatriation of India’s rightful artefacts continues under @narendramodi Govt.:
7 artefacts including 14th-century Indo-Persian sword, 11th Century carved stone door jamb & others are being repatriated back from the UK.
1/2 pic.twitter.com/7iDdfN2m2e
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) August 20, 2022
ग्लासगो नगरपरिषदेच्या शहर प्रशासन समितीने एप्रिल महिन्यात क्रॉस-पार्टी वर्किंग ग्रुप फॉर रिप्रेटीशन ॲंड स्पोलिएशन द्वारे भारत, नायजेरिया आणि चेयने नदी आणि पाइन रिज लॅकोटा सिओक्स जमातींना 51 वस्तू परत करण्याच्या शिफारसीला मान्यता दिली होती. त्यानंतर मालकी वस्तूंचे हस्तांतरण करण्यात आले. केल्विनग्रोव्ह आर्ट गॅलरी अँड म्युझियममध्ये झालेल्या बैठकीनंतर ग्लासगो म्युझियम रिसोर्स सेंटरमध्ये भारत सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) प्रतिनिधींना वस्तू पाहण्याची संधी देण्यात आली होती.