नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये गुरुवारी धडकले. त्यानंतर ते शुक्रवारी कमकुवत होत राजस्थानकडे गेले. या चक्रीवादळामुळे गुजरातमधील आठ जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकांचे स्थालांतर करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष ऑपरेशन राबवले गेले. या चक्रीवादळामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. परंतु सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे जिवीत हानी झाली नाही. यासाठी ओडिशा मॉडलचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले होते.
चक्री वादळाच्या 72 तास आधी गुजरात सरकारने 8 अतिजोखमीच्या जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख लोकांचे स्थालांतर केले होते. त्यांना कॅम्पमध्ये पाठवले होते. त्यात 1 हजार 152 गर्भवती महिला होत्या. त्यापैकी 707 महिलांनी चक्रीवादळ दरम्यान मुलांना जन्म दिला. महिलांच्या प्रसूतीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी 302 सरकारी वाहने आणि 202 रुग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. या रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय कर्मचारीही होते.
गुजरातमधून पुढे बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानमध्ये गेले. यादरम्यान अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. गुजरातसह दक्षिण-पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. आता शनिवारीही त्याचा प्रभाव ओसरणार आहे तरी पूर्व राजस्थान, लगतच्या हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडू शकतो.